शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अपात्र
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: June 6, 2023 19:26 IST2023-06-06T19:26:14+5:302023-06-06T19:26:36+5:30
जमीन वापराबाबत ग्रामपंचायतीकडून भाडेपट्टा करारनामा अथवा शासकीय जमीन वापराबाबत परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अपात्र
नंदुरबार: शासकीय शेतजमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण केल्यामुळे फेस (ता. शहादा) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि एक सदस्य, अशा तिघांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. नाशिक विभागीय अपर आयुक्त नीलेश सागर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर हे आदेश काढण्यात आले. राजश्री गणेश पाटील, लहू पूना भिल, पद्मा रंगदेव भिल, अशी अपात्र त्यांची नावे आहेत. तिघांसह त्यांच्या कुटुंबीयांनी फेस शिवारातील शासकीय जमिनीवर अवैध व बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केल्याचा आरोप फेस गावातील किशोर आत्माराम पाटील यांनी केला होता.
जमीन वापराबाबत ग्रामपंचायतीकडून भाडेपट्टा करारनामा अथवा शासकीय जमीन वापराबाबत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. महसूल विभागाचीदेखील कोणतीही परवानगी न घेता तसेच सरकारी जमीन वापरत असल्याचे तक्रारदार किशोर पाटील यांचे म्हणणे होते. याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती. जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑगस्ट २०२२ मध्ये अर्ज निकाली काढण्यात आल्यानंतर त्यांनी नाशिक विभागीय अपर आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. याठिकाणी सोमवारी कामकाज पूर्ण करण्यात आले होते. यातून किशोर आत्माराम पाटील यांच्या वतीने ॲड. राहुल कुवर पाटील यांनी बाजू मांडली. अपर आयुक्तांना शासकीय जमिनीवर अनधिकृत अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यास अपात्र ठरविले असून, तसे आदेश दिले.