नंदुरबारची नात शब्दुलीशी पंतप्रधानांचा जोहान्सबर्ग येथे संवाद

By मनोज शेलार | Updated: August 23, 2023 18:56 IST2023-08-23T18:55:52+5:302023-08-23T18:56:14+5:30

शब्दुलीशी संवाद साधत खूप शिकून भारताचे नाव मोठे कर, असा शुभेच्छारूपी आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या ‘नाती’ला दिला.

Prime Minister's interaction with Nandurbar's granddaughter Shabduli in Johannesburg | नंदुरबारची नात शब्दुलीशी पंतप्रधानांचा जोहान्सबर्ग येथे संवाद

नंदुरबारची नात शब्दुलीशी पंतप्रधानांचा जोहान्सबर्ग येथे संवाद

नंदुरबार : शब्दुलीशी संवाद साधत खूप शिकून भारताचे नाव मोठे कर, असा शुभेच्छारूपी आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या ‘नाती’ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जोहान्सबर्ग दौऱ्यावर आहेत. तेथे शब्दुली जोशी या भारतीय चिमुकलीशी संवाद साधला. विशेष म्हणजे शब्दुली जोशी मूळची नंदुरबारची आहे.

नंदुरबार येथील सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ कालिदास पाठक आणि गृहिणी सुनंदा पाठक दाम्पत्यांची सुकन्या पूर्वा जोशी आणि जावई अभियंता प्रशांत जोशी सध्या जोहान्सबर्ग येथे वास्तव्यास आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्ग दौऱ्यावर असताना योगायोगाने जोशी परिवाराची भेट झाली. या अनोख्या आणि सहृदयी भेटीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमुकली शब्दुली जोशी हिच्याशी भावनिक संवाद साधला. भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करून हिंदुस्तानचे नाव रोशन करण्याचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्दुली जोशीला दिला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या आणि आपल्या मायभूमीच्या पंतप्रधानांनी विदेशात आपल्या चिमुकलीशी संवाद साधल्याने आपण भारावल्याचे जोशी दाम्पत्याने सांगितले.
 

Web Title: Prime Minister's interaction with Nandurbar's granddaughter Shabduli in Johannesburg