बंदीवानांना गांजा पुरविणाऱ्या ड्युटीवरील होमगार्डला अटक
By मनोज शेलार | Updated: March 27, 2023 18:53 IST2023-03-27T18:52:50+5:302023-03-27T18:53:11+5:30
बंदीवानांना गांजा पुरविणाऱ्या ड्युटीवरील होमगार्डला अटक करण्यात आली आहे.

बंदीवानांना गांजा पुरविणाऱ्या ड्युटीवरील होमगार्डला अटक
नंदुरबार: जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांना गांजा पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या होमगार्डविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल चुनिलाल वळवी (२६, रा.धुळवद, ता.नंदुरबार) असे होमगार्डचे नाव आहे. २६ मार्च रोजी वळवी याची ड्युटी कारागृहात होती. त्यावेळी तो कारागृहाच्या स्वयंपाकगृहात वारंवार चकरा मारत होता. त्यामुळे संशय आल्याने कारागृह अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
त्याच्या शासकीय गणवेशाची झडती घेतली असता, खिशामध्ये गांजा सापडला. २६ ग्रॅम वजनाच्या चार पुड्यांमध्ये हिरवा सुका गांजा होता. याशिवाय गणवेशातच पाच हजार १६० रुपये होते. त्याच्याकडील गांजा व पैसे जप्त करण्यात आले. गांजा व पैसे कारागृहातील बंदीवानांना पुरविण्याचा तो प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याबाबत कारागृह अधिकारी सुभेदार जनार्दन गोपाल बोरसे यांनी फिर्याद दिल्याने, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात होमगार्ड अनिल वळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी करत आहेत.