सोबत येण्यास नकार देताच पत्नीच्या डोक्यात दगडाचा घाव
By मनोज शेलार | Updated: April 30, 2023 17:51 IST2023-04-30T17:51:12+5:302023-04-30T17:51:32+5:30
पतीसोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना नवापुरात घडली.

सोबत येण्यास नकार देताच पत्नीच्या डोक्यात दगडाचा घाव
नंदुरबार: पतीसोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना नवापुरात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर शहरातील तीनटेंभा परिसरात ही घटना घडली. मोठे कडवान येथे राहणारा आकाश डेड्या गावित (२८) व सोनल आकाश गावित (२४) हे पती-पत्नी आहेत. सोनल ही माहेरी तीनटेंभा-नवापूर येथे निघून आली होती. त्यावरून पती-पत्नीत कुरबूर होती. २९ एप्रिल रोजी आकाश हा सोनलला घेण्यासाठी तीनटेंभा येथे आला असता, त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
सोबत घरी चल म्हणून तो तिला सांगू लागला. परंतु, सोनल ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे चिडलेल्या आकाशने तेथील धारदार किनार असलेला दगड उचलला व सोनलला मारहाण करू लागला. डोके, कपाळावर दगड मारल्याने सोनल गंभीर जखमी झाली. हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. याबाबत सोनल गावित हिने नवापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने आकाश डेड्या गावित याच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार दादाभाऊ वाघ करत आहेत.