भरधाव रिक्षा उलटल्याने चालक ठार, एकजण जखमी
By मनोज शेलार | Updated: January 3, 2024 18:07 IST2024-01-03T17:59:41+5:302024-01-03T18:07:20+5:30
नंदुरबार तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

भरधाव रिक्षा उलटल्याने चालक ठार, एकजण जखमी
मनोज शेलार, नंदुरबार : भरधाव रिक्षावरील चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना चौपाळे फाट्यानजीक मंगळवारी रात्री घडली. याबाबत नंदुरबार तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर ॲपेरिक्षा (क्रमांक एमएच ३९ जे ६६८) भरधाव जात होती. चालक मंगा चंदऱ्या सोनवणे (५५), रा. चाकळे, ता. नंदुरबार याचे रिक्षावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे रिक्षा चौपाळे फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ उलटली. यात चालक सोनवणे यांना गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत रिक्षामध्ये बसलेले भाईदास शंकर सोनवणे, रा. चाकळे हे गंभीर जखमी झाले. जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मंगा सोनवणे यांना तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले.
याबाबत चुनिलाल अण्णा सोनवणे यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार तालुका पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहे.