खातेदारांच्या बनावट सह्या करून काढले सहा लाख ९५ हजार; गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Updated: December 16, 2023 17:05 IST2023-12-16T17:03:53+5:302023-12-16T17:05:32+5:30
याप्रकरणी तपासानंतर तीन वर्षांनंतर धडगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खातेदारांच्या बनावट सह्या करून काढले सहा लाख ९५ हजार; गुन्हा दाखल
मनोज शेलार,नंदुरबार : स्टेट बँकेच्या कॅशिअरने खातेदारांच्या बनावट सह्या करून नऊ महिन्यांत तब्बल सहा लाख ९५ हजार ९०० रुपये काढून घेतल्याचा प्रकार धडगाव शाखेत घडला होता. याप्रकरणी तपासानंतर तीन वर्षांनंतर धडगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमसिंग वन्या राहसे (५५, रा.नंदुरबार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, धडगाव येथील स्टेट बँक शाखेत २० जानेवारी २०२० ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत संशयित राहसे यांनी कॅशिअरचे काम त्यांच्याकडे असताना खातेदारांच्या खोट्या व बनावट सही करून आणि अंगठे घेऊन परस्पर सहा लाख ९५ हजार ९०० रुपये काढून घेतले होते. ही बाब लक्षात आल्यावर बँकेतर्फे चौकशी करण्यात आली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२३ रोजी याबाबत शाखाधिकारी भूषण जयंत अत्रे यांनी फिर्याद दिली. त्यावरून भीमसिंग राहसे यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसांत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार राहुल पाटील करीत आहेत.