२४० रणरागिणी नांदेड महापालिकेच्या आखाड्यात; पत्नीच्या विजयासाठी 'पतीराजांची' कसरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:35 IST2026-01-10T18:35:36+5:302026-01-10T18:35:47+5:30
कौटुंबिक जबाबदारी पेलत नांदेडच्या महिला उतरल्या राजकीय आखाड्यात.

२४० रणरागिणी नांदेड महापालिकेच्या आखाड्यात; पत्नीच्या विजयासाठी 'पतीराजांची' कसरत
नांदेड : महापालिका निवडणुकीत २० प्रभागांत पक्षीय आणि अपक्ष अशा एकूण २४० महिला रिंगणात उतरल्या आहेत. सर्वसाधारण गटातूनही अनेक महिलांनी आपली दावेदारी केली आहे. अर्धांगिनीला निवडून आणण्यासाठी पतीराजांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. अनेक ठिकाणी आरक्षण महिलेला सुटल्यामुळे माजी नगरसेवकांना आपल्या पत्नीला पुढे करावे लागले होते. त्यामुळे पत्नीच्या विजयासाठी पतीराजांकडून चांगलाच जोर लावला जात आहे. प्रभाग आरक्षण आणि जागा वाटपाच्या सूत्रामुळे अनेक माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरता आले नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला होता.
पतीच्या कामाच्या जोरावर अनेक महिला रिंगणातही उतरल्या आहेत. तर अपक्ष किंवा इतर पक्षांकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महापालिकेत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे प्रत्येकच प्रभागात महिलांना संधी मिळाली. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळतच या महिला निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावताना दिसत आहेत. २४० महिलांपैकी किती जणी सभागृहात पोहोचतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मी तुमची लाडकी बहीण
राज्यात निवडणूक प्रचारात महायुतीतील तिन्ही पक्ष लाडकी बहीण योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. तिन्ही पक्षांचे नेते प्रचारात आपल्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू झाल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे नांदेड शहरात मात्र पक्षीय आणि अपक्ष महिला उमेदवार घरोघरी भेट देऊन पुरुष मतदारांना मी तुमचीच बहीण आहे, असे समजून आशीर्वाद मागत आहेत.
कोणत्या प्रभागात किती महिला
प्रभाग क्रमांक १- १८, २ - १४, ३ - १५, ४ - १०, ५ - १६, ६ - १३, ७ - ७, ८ - ८, ९ - १०, १० - ८, ११ - ७, १२ - १३, १३ - १३, १४ - १४, १५ - १२, १६ - १६, १७ - ५, १८ - १२, १९ - १५ आणि प्रभाग क्रमांक २० मध्ये १६ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत.