भाजप आमदार वेळीच धडा घेणार का? नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकराव फॅक्टर’ केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:22 IST2025-12-25T19:21:55+5:302025-12-25T19:22:17+5:30

अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील दोन्ही नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला असला, तरी जिल्ह्यातील इतर भागांत सत्ताधारी आमदारांचे गणित बिघडले.

Will BJP MLAs learn their lesson in time? 'Ashok Rao Chavhan Factor' again at the center in Nanded | भाजप आमदार वेळीच धडा घेणार का? नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकराव फॅक्टर’ केंद्रस्थानी

भाजप आमदार वेळीच धडा घेणार का? नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकराव फॅक्टर’ केंद्रस्थानी

नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. या निकालांतून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सर्वमान्य असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या महायुतीतील अनेक आमदारांना अपेक्षित यश मिळवता आले नाही, ही बाब आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

विशेष म्हणजे, अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघातील दोन्ही नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला असला, तरी जिल्ह्यातील इतर भागांत सत्ताधारी आमदारांचे गणित बिघडले. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या, काँग्रेस किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी बाजी मारली. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विद्यमान आमदारांना आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राजकीय अभ्यासकांच्या मते, नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आमदारांनी अशोकराव चव्हाण यांना डावलून आखलेले नियोजनच अपयशाचे कारण ठरले. २००९ मध्ये मुख्यमंत्री असताना अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदारसंघांवर आघाडीचा झेंडा फडकवला होता. त्यानंतर २०२४ मध्ये महायुतीने शंभर टक्के यश मिळवले असले, तरी निवडणुकीनंतर घटकपक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांमधील विसंवाद आणि स्वतंत्र लढतींमुळे अनेक निष्ठावंतांना पराभव स्वीकारावा लागला.

या पार्श्वभूमीवर भाजपने नांदेड महापालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी पुन्हा अशोकराव चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. खासदार डॉ. अजित गोपछडे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करत, जुने-नवे वाद आणि इच्छुकांच्या तक्रारींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पाऊलच पक्षाला अशोकरावांच्या अनुभवाची आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असल्याचे अधोरेखित करते. पालिका निकालांकडे पाहिले तर बिलोली, धर्माबाद येथे मतदारांनी स्थानिक नेतृत्वाला आणि त्यांच्या मागे असलेल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला कौल दिला. उमरी येथे राष्ट्रवादी (अजित पवार)च्या गोरठेकर बंधूंनी २० पैकी १८ जागा जिंकत नगराध्यक्षपदावर बाजी मारली आणि थेट जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले. त्यांनी आमदार राजेश पवार यांच्यासह भाजप नेत्यांना उघड आव्हान दिले. मुखेडमध्ये शिंदेसेनेच्या विजया देबडवार यांच्या यशाने आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यापुढे आव्हान उभे राहिले. किनवट, कंधार, हिमायतनगर या ठिकाणीही सत्ताधारी आमदारांना आपली छाप पाडता आली नाही. हदगाव-हिमायतनगरमध्ये काँग्रेसच्या यशामुळे आगामी काळात माजी आमदार माधवराव जवळगावकर हे विरोधकांना पुन्हा ‘हात’ दाखवू शकतात.

आता तरी भाजप नेत्यांची वज्रमूठ होणार का?
आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदारांनी या निकालांचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. विशेषतः भाजप आमदारांनी अशोकराव चव्हाण यांच्याशी समन्वय साधत संघटनात्मक वज्रमूठ बांधली, तरच जिल्हा परिषद आणि महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणे शक्य होईल. अन्यथा नगरपालिका निवडणुकांनी दिलेला इशारा दुर्लक्षित केल्यास त्याची पुनरावृत्ती मोठ्या निवडणुकांत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चिखलीकरांचेही नेतृत्व सिद्ध
आमदार प्रतापराव चिखलीकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहा पालिकेत त्यांनी भाजपला धोबीपछाड देत आपले नेतृत्व सिद्ध केले. तसेच जिल्ह्यातील १३ पालिकांपैकी तीन पालिकांवर राष्ट्रवादी (अजित पवार)चा नगराध्यक्ष आणि तब्बल ७१ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. त्या तुलनेत सत्ताधारी शिंदेसेनेला यश प्राप्त करता आलेले नाही.

Web Title : क्या भाजपा सीखेगी? नांदेड़ में फिर 'अशोकराव फैक्टर' केंद्र में।

Web Summary : नांदेड़ नगर निगम चुनाव परिणाम अशोकराव चव्हाण के प्रभाव को दर्शाते हैं। भाजपा की हार बेहतर समन्वय की आवश्यकता का संकेत देती है, जिसके लिए आगामी चुनावों में चव्हाण के नेतृत्व की आवश्यकता हो सकती है। विभाजन से भाजपा को नुकसान।

Web Title : Will BJP Learn? Ashokrao Factor Central Again in Nanded.

Web Summary : Nanded civic poll results highlight Ashokrao Chavan's continued influence. BJP's losses signal need for better coordination, potentially requiring Chavan's leadership for upcoming elections. Divisions hurt BJP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.