मतदान काही तासांवर; वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठकासह पडद्याआडून सोंगट्या हलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:03 IST2026-01-14T19:02:34+5:302026-01-14T19:03:12+5:30
महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सर्वपक्षीय उमेदवारांसोबत अपक्षांही मोठा भरणा आहे.

मतदान काही तासांवर; वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठकासह पडद्याआडून सोंगट्या हलणार
नांदेड : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचारतोफा थंडावल्या. त्यामुळे आता जाहीर सभा, रॅलींना ब्रेक लागला आहे. परिणामी वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठका तसेच पडद्याआडून मोठ्या हालचालींवर उमेदवारांचा भर राहणार असून, १४ जानेवारीची रात्र ही सर्वच उमेदवारांसाठी वैऱ्याची ठरणार आहे. त्यासाठी डोळ्यांत तेल घालून सर्वपक्षीय कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सर्वपक्षीय उमेदवारांसोबत अपक्षांही मोठा भरणा आहे. ३ जानेवारीला चिन्हांचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी प्रत्यक्ष १० दिवसांचा वेळ मिळाला. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना त्यांच्या हक्काच्या चिन्हामुळे अधिकचा वेळ मिळाला. तर अपक्षांना मात्र आपली निवडणूक निशाणी मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठविण्यात आली होती. सभा, प्रचार रॅली, गाठीभेटींनीही गेल्या काही दिवसांत रणधुमाळी चांगलीच रंगात आली होती. मंगळवारी शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रचार रॅली काढल्या. तसेच मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रचाराची मुदत संपेपर्यंत काही प्रभागांत नेत्यांच्या सभा सुरू होत्या. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
बॅनर हटले, रस्त्यांचाही मोकळा श्वास
निवडणुकीच्या काळात शहरात उमेदवार आणि पक्षांचे मोठ्या प्रमाणात बॅनर, झेंडे लावण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळनंतर बॅनर, झेंडे काढण्यात आले. कर्णकर्कश आवाज करणारे रिक्षावरील भोंगेही बंद झाले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
दोन दिवस प्रशासनाची कसरत
बुधवारची रात्र आणि गुरुवारी मतदानाचा दिवस असे दोन दिवस प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे. कारण, या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात मतदारांना पैसे वाटप, प्रभोभने दिली जातात. त्यातून काही ठिकाणी वादही उद्भवतात. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.