निसटता पराभव जिव्हारी, केवळ १ व २ मतांनी निवडून आले नांदेड जिल्ह्यात दोन उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 19:36 IST2025-12-23T19:34:45+5:302025-12-23T19:36:36+5:30
काठावर पास झालेल्या नगरसेवकांच्या आनंदाला उधाण

निसटता पराभव जिव्हारी, केवळ १ व २ मतांनी निवडून आले नांदेड जिल्ह्यात दोन उमेदवार
नांदेड : जिल्ह्यातील १२ नगरपरिषद व एक नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित झाला. काही निकाल अपेक्षित तर काही ठिकाणचे निकाल अतिशय धक्कादायक लागले आहेत. काठावर पास झालेल्या उमेदवारांचे नशीब फळफळले असून त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे तर दुसरीकडे निसटता पराभव झालेल्या उमेदवारांचा स्वप्नभंग झाला असून ही हार त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
मुदखेड नगरपरिषदेत भाजपा उमेदवार प्रेमला गोपीनाथ पांचाळ या अवघ्या १ मताने निवडून आल्या असून पालिका सभागृहात जाण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार मोहंमद शाहिदा मो. शफी यांचा या विजयापासून केवळ १ मताने दूर राहिल्याने या जागेची केवळ मुदखेड शहरातच नव्हे तर सबंध जिल्ह्यात चर्चा होत आहे. शिवाय एक मत किती मौल्यवान असते याची प्रचितीही या निमित्ताने पहावयास मिळाली आहे. असाच काहीसा प्रकार किनवट नगरपरिषदेतही समोर आला असून प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार श्रीराम नारायणराव नेम्मानीवार हे ६३२ मते मिळवून विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार फिरोज बाबू तवर यांना या निवडणूकीत ६३० मते मिळाली असून दोघांमध्ये केवळ २ मतांचा फरक आहे. केवळ दोन मतांनी नेमान्नीवार सभागृहात पोहोचले असून फिरोज तवर यांचा स्वप्नभंग झाला आहे. केवळ १ ते २ मतांनी झालेली हार चांगलीच चर्चेत असून हारकर जीतने वालो को बाजीगर कहते है..असे म्हणून पाठीराखे पराभूत उमेदवारांच्या दुखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
किनवट पालिकेत प्रभाग क्रमांक १ अ मध्ये भाजपाचे संतोष किशनराव मरस्कोले व उबाठाचे प्रेमदास सखाराम मेश्राम या दोघांत थेट लढत झाली. चुरशीच्या सामन्यात भाजपा उमेदवार संतोष मरस्कोले हे अवघ्या १३ मतांनी विजयी झाले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ९ ब मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बेग नईमा बेगम या ५०८ मते घेऊन विजयी झाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खान सजित निसारखान हे पराभूत झाले. येथील उमेदवार केवळ १४ मतांनी काठावर पास झाले.
कंधार नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला. प्रभाग क्रमांक ७ ब मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महंमद जफरोद्दीन हे १५ मतांनी विजयी झाले. प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस उमेदवार यांना ६२५ मते मिळाली. दोघांतील तफावत अत्यल्प असल्याने या निकालाची चर्चा शहरभर झाली. सोबतच प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये अपक्ष उमेदवार राजू सोनकांबळे अवघे ४ मतांचे मताधिक्य घेत विजयी झाले असून प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सविता कांबळे यांचा त्यांनी पराभव केला. अवघ्या चार मतांनी कांबळे यांचा झालेला निसटता पराभव यशाला हुलकावणी देणारा ठरला.
हिमायतनगरातही काँग्रेस उमेदवार विनोद गडेवार हे केवळ १८ मतांनी विजयी झाले. तसेच प्रभाग क्रमांक ८ मध्ये उबाठाचे उमेदवार मिर्झा जिशान बेग हे २० मतांनी जिंकले असून शहरात नगरपंचायतीत उबाठा गटाचे ते एकमेव सदस्य राहणार आहेत. बिलोली न.प.त प्रभाग क्रमांक १ ब मधून काँग्रेस उमेदवार खान मैमुना बेग यांनी मजपा शविआ.चे उमेदवार शेख मालनबी अहेमद यांचा १५ मतांचे मताधिक्य घेत काठावरचा विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक ९ अ मध्ये अनुपमा महेंद्र गायकवाड या २७ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार सविता राजेंद्र कांबळे यांचा पराभव केला. या निकालाने पालिकांवर साडेतीन वर्षांपासून असलेले प्रशासक राज संपुष्टात आले असून आता लोकशाही पद्धतीने नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांची कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही व मनमानीला चाप बसणार असून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा प्रभागातच होणार आहे.
प्रचंड मताधिक्य घेत मजपाने उभारली धर्माबादेत विजयाची गुढी
आक्षेप आल्याने जिल्ह्यातील धर्माबाद व मुखेड नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबर रोजी झाली. जशी निवडणूक चर्चेत आली तशी दोन्ही जागांचा निकालही तितकाच चर्चेत राहिला. धर्माबाद पालिकेत २२ पैकी १५ जागा मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांनी काबीज केल्या. उर्वरित ७ जागा भाजपाच्या पारड्यात पडल्या. नेतेमंडळी, लोकप्रतिनिधींनी ताकद झोकूनही येथे भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. प्रस्थापित उमेदवारांना लोळवत मजपा उमेदवारांनी मिळविलेले निर्भेळ यश विजयी व पराभूत उमेदवारांतील असलेली मतांची तफावत स्पष्ट करते. विशेष म्हणजे या नगरपरिषदेत एकही अपक्ष अथवा अन्य पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही. दरम्यान, मुखेड पालिकेत भाजपाची सत्ता आली असली तरी येथील नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विजयमाला देबडवार यांना जनतेने विराजमान करून राजकीय समीकरण पुरते बदलून टाकले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांची सभा येथे नगराध्यक्षपद आणू शकली नाही, अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे.