कार्यकर्ते मिळत नसल्याने नातेवाईकही प्रचारकामात; प्रभागात फिरून मागताहेत उमेदवारासाठी मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 20:09 IST2026-01-09T20:06:09+5:302026-01-09T20:09:37+5:30
मनपाच्या ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात असून, प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.

कार्यकर्ते मिळत नसल्याने नातेवाईकही प्रचारकामात; प्रभागात फिरून मागताहेत उमेदवारासाठी मत
नांदेड : ‘लाल गंधाचा टिळा उमेदवारांच्या भाळी; उमेदवार प्रचार करतात सकाळी-सकाळी’ अशी स्थिती शहरात प्रचारादरम्यान सर्वत्र पाहायला मिळत आहे. मनपाच्या ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार रिंगणात असून, प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. या धावपळीत उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबही मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांची जीवनशैली पूर्णपणे बदलली असून, सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत असा दिनक्रम पाहावयास मिळत आहे. सकाळी ६ वाजता उठून स्नान, कपाळावर टिळा, अंगावर पांढरे शुभ्र कपडे आणि गळ्यात पक्षाचा रुमाल घालून उमेदवार सज्ज होऊन बाहेर पडत आहेत. सकाळी साडेसात वाजेदरम्यान चहा घेऊन घराबाहेर पडणे आणि कॉलनीत किंवा रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नम्रपणे ‘नमस्कार’ करून ‘मी निवडणुकीत उभा आहे, थोेडे लक्ष असू द्या’ असे म्हणून पुढचे घर करणे असा दिनक्रम पाहावयास मिळत आहे. कार्यकर्त्यांसह प्रभागात सकाळच्या वेळी मुख्य प्रचारफेरीला प्रारंभ. दुपारच्या वेळी बैठक त्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी, संध्याकाळी पाच वाजेदरम्यान पुन्हा दुसरी मुख्य प्रचार फेरी आणि रात्री ९:३० नंतर घरी परतल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाची आखी केली जात आहे.
महिला उमेदवारांचा उत्साह दांडगा...
प्रचारफेरीत महिला उमेदवारांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरत आहे. सकाळी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास महिला उमेदवार कार्यकर्त्यांसह मैदानात उतरतात. महिला कार्यकर्तेही गळ्यात पक्षाचे रुमाल घालून घरोघरी पत्रके वाटताना दिसत आहेत.
अपार्टमेंटच्या पायऱ्या चढताना होतेय ‘दमछाक’....
प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार मॉर्निंग वॉकची ठिकाणे, उद्याने, मंदिरे, चहाच्या टपऱ्या आणि अगदी सलूनमध्येही चकरा मारत आहेत. मात्र उंच अपार्टमेंट्समध्ये ‘लिफ्ट’ नसल्यास किंवा प्रत्येक फ्लॅटपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढताना उमेदवारांची दमछाक होत आहे. ‘साहेब यावेळेस लक्ष ठेवा’ अशी विनवणी करत उमेदवार मंडळी मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कार्यकर्त्यांची ‘सोय’ अन् महिलांना 'रोजगार'...
उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांची ‘सोय’ चोख ठेवली आहे. प्रचारासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. अनेक उमेदवारांनी मंगल कार्यालये, हॉल किंवा स्वतःचे बंगले महिनाभरासाठी बुक केले आहेत. तिथेच सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जात आहे. काही उमेदवारांनी थेट खाणावळींशी करार केला आहे.
प्रचार संपल्यानंतर घरी पोहोचवणे...
महिला कार्यकर्त्यांना घरापासून आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहनांची स्वतंत्र जबाबदारी काही ठराविक पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रचारात सहभागी होणाऱ्या स्थानिक महिलांना एका प्रकारे महिनाभराचा रोजगारच उपलब्ध झाला आहे. एकंदर सत्तेच्या चाव्या मिळविण्यासाठी उमेदवार मंडळी वेगवेगळे फंडे वापरत आहेत.