police force deployed in Strongroom area, citizens ban | स्ट्राँगरूम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, नागरिकांना प्रतिबंध

स्ट्राँगरूम परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, नागरिकांना प्रतिबंध

ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतन परिसरात स्ट्राँगरुम

नांदेड : नांदेडलोकसभा मतदार संघासाठी गुरुवार, १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यानंतर सर्व केंद्रावरून सील करून आलेल्या ईव्हीएम नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंगरुममध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय सीलबंद करून ठेवण्यात आलेल्या आहेत.
स्ट्रॉंगरुम परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या परिसराला त्रिस्तरीय सुरक्षायंत्रणा ठेवण्यात आलेली आहे. प्रथमत: सीआरपीएफ प्लाटून नंतर एसआरपीएफचे जवान तसेच बाहेरील बाजूस पोलीस यंत्रणा सुरक्षिततेसाठी सज्ज करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार सदरील इमारतीपासून १०० मीटर परिसर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे कोणालाही स्ट्रॉंगरूम परिसरात प्रवेश राहणार नाही. या इमारतीत नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व त्या परिसरात नियुक्त करण्यात आलेले कामगार यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ओळखपत्र देण्यात आले आहेत. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना रजिस्टरवर नोंद करून प्रवेश देण्यात येईल.
स्ट्रॉंगरूमसाठी वर्ग-१ व २ चे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. दर ८ तासांनी अधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंगरूम परिसराची तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्राँग रुम परिसरात पाहणीसाठी परवानगीने तंबू लावता येणार आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघात ६५.१५ टक्के मतदान झाले. या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅट गुरुवारी पहाटेपर्यंत नांदेड मतदारसंघांतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये आणण्यात आल्या.
स्ट्राँग रुममध्ये या मशीन विधानसभा मतदारसंघनिहाय ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पहिल्या दिवशीच स्ट्राँगरुमला भेट दिली.
शस्त्रधारी पोलिसांचा पहारा
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान इमारतीमध्ये असलेल्या स्ट्राँगरुमवर सीआरपीएफ, एसआरपीएफ जवानांची करडी नजर राहणार आहे. त्याचवेळी या स्ट्राँगरुमच्या बाहेरील बाजूस पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

Web Title: police force deployed in Strongroom area, citizens ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.