आमदार कल्याणकरांना विरोध पडला महागात; 'डीसीएम'च्या निकटवर्तीयांचे तिकीटच कापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:13 IST2026-01-03T15:11:48+5:302026-01-03T15:13:16+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाला अति आत्मविश्वास नडला

आमदार कल्याणकरांना विरोध पडला महागात; 'डीसीएम'च्या निकटवर्तीयांचे तिकीटच कापले
नांदेड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून चर्चेत असलेल्या गजानन पाटील यांचा अतिविश्वास अखेर त्यांना महागात पडला आहे. त्यांनी आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा केलेला विरोध त्यांच्या अंगलट आला असून, त्यांच्या पत्नी मीनल पाटील यांची उमेदवारी कापली आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी देत आमदारांनी मतदार संघात माझाच शब्द अंतिम हे सिद्ध करून दाखविले.
गजानन पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात 'आपले सरकार' जनकल्याण कक्षाचे प्रमुख होते. त्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली. मात्र, नांदेडच्या राजकारणात ही जवळीक उमेदवारीसाठी अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी मोठा गाजावाजा करत मागील सहा ते आठ महिन्यांपासून सांगवी प्रभागातून तयारी चालविली होते. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण करून आम्ही शिंदे कुटुंबीयांच्या किती जवळचे आहोत, हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु त्यांनी स्थानिक आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्याशी सातत्याने घेतलेली विरोधी भूमिका अखेर त्यांच्या अंगलट आली.
कार्यकर्त्याला दिली संधी
शिंदेसेनेकडून नांदेड महापालिका निडणुकीत उमेदवार ठरविण्याचे आणि 'एबी' फॉर्म देण्याचे सर्वाधिकार स्थानिक आमदारांनाच दिले होते. त्याच अधिकारांचा वापर करत कल्याणकर यांनी पाटील यांचा पत्ता कट केला. त्यांनी या प्रभागात आपल्या विश्वासू कार्यकर्त्याला संधी देत, शहरप्रमुख श्याम कोकाटे यांच्या मातोश्री करुणा कोकाटे यांना शिंदेसेनेची उमेदवारी दिली आहे. पाटील यांच्यासाठी आमदार हेमंत पाटील यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, आमदार कल्याणकर यांच्या ठाम विरोधापुढे हे प्रयत्न निष्फळ ठरले.