तिकीट कुणाचेही चालेल पण निवडणूक लढविणारच! नांदेडमध्ये इच्छुकांचे दोन डगरीवर हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:20 IST2025-12-29T17:18:53+5:302025-12-29T17:20:07+5:30
पक्षाकडून तिकीट मिळाले नाही, तर राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ नये, यासाठी अनेक इच्छुकांनी एकाच वेळी विविध पक्षांकडून तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत ‘नहले पे दहला’ची तयारी ठेवली आहे.

तिकीट कुणाचेही चालेल पण निवडणूक लढविणारच! नांदेडमध्ये इच्छुकांचे दोन डगरीवर हात
नांदेड- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना संपूर्ण राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे प्रमुख पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी अद्याप गुलदस्त्यातच असून, दुसरीकडे इच्छुक उमेदवार मात्र कोणतीही संधी हातातून जाऊ न देता थेट मैदानात उतरले आहेत. संभाव्य बंडखोरीची भीती आणि अंतर्गत गटबाजीमुळे पक्षनेतृत्वाने मौन पत्करले असले तरी इच्छुकांनी मात्र उघड राजकीय डाव खेळण्यास सुरुवात केली आहे.
पक्षाकडून तिकीट मिळाले नाही, तर राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ नये, यासाठी अनेक इच्छुकांनी एकाच वेळी विविध पक्षांकडून तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत ‘नहले पे दहला’ची तयारी ठेवली आहे. नेत्यांकडूनच राजकीय डावपेच शिकल्याचे हे जिवंत उदाहरण मानले जात असून, “राजकारणात टिकायचे असेल तर मुरब्बीपणा आवश्यक आहे,” हे समीकरण नवखे उमेदवारही कृतीतून दाखवून देत आहेत.महापालिकेतील जुने, अनुभवी खेळाडू शांतपणे परिस्थितीची वाट पाहत असले तरी नवखे उमेदवारही कुठेही कमी नसल्याचे स्पष्ट होत आहे. “तिकीट कोणत्याही पक्षाकडून मिळो, ते केवळ माध्यम आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हीच तुमचा हक्काचा माणूस,” असा दावा करत इच्छुक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकाच वेळी दोन डगरीवर हात
शनिवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये एका महिला उमेदवाराने काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे तब्बल तीन अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र संबंधित पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म ज्याच्या हाती असेल, तोच उमेदवार अंतिम रिंगणात राहणार असल्याने अनेकांचे भवितव्य पक्ष निर्णयावरच अवलंबून आहे. दरम्यान, प्रचारासाठी लागणारी रसद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती यावरही पुढील समीकरणे ठरणार आहेत. एकाच वेळी दोन डगरीवर हात ठेवणाऱ्या उमेदवारांना मतदार पसंती देतील की नाकारतील, याचे उत्तर निकालानंतरच मिळणार आहे.
इच्छुकांकडून अन मतदारांकडूनही मोर्चेबांधणी
नांदेड महापालिकेच्या ८१ जागांसाठी २० प्रभागांतून पाच लाखांहून अधिक मतदार मतदान करणार असून १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत सर्व इच्छुक उमेदवार आखाड्यात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत समर्थक आणि मतदारांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत.