छत्रपती संभाजीनगरसह नांदेडमध्येही एमआयएम दोन नंबरवर; 'विरोधी' भूमिका ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:46 IST2026-01-17T18:45:44+5:302026-01-17T18:46:26+5:30
Nanded Municipal Election Results 2026: नांदेड महापालिकेत एमआयएमचे जोरदार पुनरागमन; १५ जागांवर विजय

छत्रपती संभाजीनगरसह नांदेडमध्येही एमआयएम दोन नंबरवर; 'विरोधी' भूमिका ठरणार निर्णायक
- भारत दाढेल
नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने जोरदार पुनरागमन करत आपले राजकीय अस्तित्व पुन्हा सिद्ध केले आहे. भाजपने ४५ जागा मिळवत सत्ता मिळविली असली, तरी विरोधी बाकड्यावर आता १५ जागा मिळविलेला 'एमआयएम' हा प्रमुख पक्ष राहणार आहे. परिणामी महापालिकेतील एमआयएमची भूमिका आगामी काळात महत्वपूर्ण ठरणार आहे.
नांदेड मनपाच्या इतिहासात प्रथमच २०१२ मध्ये एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आल्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले होते. नांदेडमार्गे महाराष्ट्रात एंट्री केली. मात्र २०१७ च्या नांदेड महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्या अपयशानंतर पक्षाची ताकद कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने संघटनात्मक ताकद आणि प्रचाराच्या जोरावर १४ जागांवर विजय मिळवत दणक्यात पुनरागमन केले आहे. या निवडणुकीत एमआयएमने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. पक्षाला कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाची आघाडी किंवा थेट साथ नव्हती. तरीही मतदारांनी एमआयएमवर विश्वास दाखवत मोठ्या संख्येने उमेदवार निवडून दिले.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मुस्लीम मतदार आपल्याकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली. मुस्लीम मतदारांनी एमआयएमला पसंती दिल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार विखुरला गेला, हा काँग्रेससाठी धक्का आहे. काँग्रेसचा हक्काचा मतदार मानला जाणारा मुस्लीम समाज आता हळूहळू काँग्रेसपासून दूर जात असल्याचे या निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे.
बदलते राजकीय समीकरण
११ वरून थेट १५ नगरसेवकांपर्यंत झालेली वाढ ही केवळ आकड्यांची वाढ नसून, ती एमआयएमच्या वाढत्या राजकीय प्रभावाची नांदी मानली जात आहे. आगामी काळात नांदेड महापालिकेच्या राजकारणात भाजप सत्ताधारी असला, तरी विरोधक म्हणून एमआयएमची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार आहे.
ओवेसींनी आव्हान दिलेली 'ती' जागा काँग्रेसने जिंकली
ओवेसी यांनी माजी महापौर अब्दूल सत्तार यांना त्यांचा मुलगा अब्दूल गफ्फार निवडून येणार नाही असे भर सभेत सांगितले होते. मात्र, ओवेसी यांनी आव्हान दिल्यावरही अब्दूल सत्तार यांच्या मुलाने तब्बल ४४०४ मताधिक्य घेत मोठे यश मिळविले.
ओवेसी यांच्या सभेचा परिणाम
निवडणूक प्रचारादरम्यान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे घेतलेली जाहीर सभा निर्णायक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ओवेसींच्या आक्रमक भाषणामुळे मुस्लीम मतदारांमध्ये उत्साह संचारला आणि त्याचा थेट फायदा एमआयएमच्या उमेदवारांना झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एमआयएमचे प्रभाग क्रमांक ११ मध्ये ४, प्रभाग १२ मध्ये २, प्रभाग १३ मध्ये ४, प्रभाग १४ मध्ये ३, प्रभाग १५ मध्ये २ असे एकूण १५ उमेदवार विजयी झाले.
अनपेक्षित निकालाने सर्वांनाच बसला झटका
नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच झटका बसला. नांदेडमध्ये कोणाची सत्ता येणार याविषयी राजकीय विश्लेषकांनाही सांगता येत नव्हते. परंतु भाजपला बहुमत मिळणार हे तेवढेच सत्य होते. यामध्ये एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी करणारा पक्ष ठरेल, असे मात्र कोणालाही वाटले नाही. कारण २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाला मतदारांनी नाकारले होते. त्यामुळे यावेळेस एमआयएमला किती जागा मिळणार? याविषयी तेवढी स्पष्टता नव्हती. परंतु प्रस्थापित पक्षांना मागे टाकत एमआयएमने पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांचे तब्बल १५ नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. ही किमया इतर पक्षांना साधता आली नाही. विशेषतः काँग्रेस पक्ष यामध्ये कमी पडला आहे.