नांदेड मनपा निवडणूक: संथ सुरुवातीनंतर सायंकाळी मतदारांच्या रांगा, वेळ संपल्याने अनेक निराश
By अविनाश पाईकराव | Updated: January 15, 2026 18:29 IST2026-01-15T18:29:13+5:302026-01-15T18:29:53+5:30
दुपारी चार वाजेनंतर मात्र शहरातील चित्र पूर्णपणे बदलले आणि मतदारांनी मतदानासाठी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या.

नांदेड मनपा निवडणूक: संथ सुरुवातीनंतर सायंकाळी मतदारांच्या रांगा, वेळ संपल्याने अनेक निराश
- अविनाश पाईकराव
नांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला असला तरी, सायंकाळच्या सत्रात मतदारांनी केंद्रांबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र, साडेपाच वाजेची वेळ संपल्यानंतर पोलिसांनी मतदान केंद्रांचे गेट बंद केले. त्यानंतर आलेल्या अनेक मतदारांना निराश होऊन परतावे लागले.
सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत केवळ ७.१६ टक्के मतदान झाले होते. जसजसा दिवस सरकला तसतसा मतदानाचा टक्का वाढत गेला. दुपारी ११:४० वाजेपर्यंत १७.१४ टक्के, तर दुपारी ३:३० वाजेपर्यंत सरासरी ४१.६७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. प्रभागनिहाय विचार करता प्रभाग क्रमांक ११ हैदरबाग येथे सर्वाधिक ५१.५ टक्के, तर प्रभाग क्रमांक ६ गणेशनगर भागात सर्वात कमी २९.८९ टक्के मतदान झाले होते. दुपारी चार वाजेनंतर मात्र शहरातील चित्र पूर्णपणे बदलले आणि मतदारांनी मतदानासाठी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या.
निवडणूक विभागाकडून सायंकाळी ५:३० वाजेनंतर येणाऱ्या मतदारांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने, मतदारांनी त्यापूर्वीच केंद्रात पोहोचण्यासाठी धावपळ केली. मतदान केंद्रांमध्ये शिरण्यासाठी मतदारांची मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत अनेक प्रभागांत मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप झाल्याची चर्चाही मतदारांमध्ये रंगली होती. ज्या मतदारांना पैसे मिळाले नाहीत, अशा काही नाराज मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचेही काही भागात दिसून आले. एकूणच संथ सुरुवातीनंतर शेवटच्या काही तासांत मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे मतदानाचा अंतिम टक्का वाढण्याची शक्यता आहे.