Maharashtra Election 2019: पराभवाच्या छायेने अनेक उमेदवारांचे अवसान गळाले; अंतिम टप्प्यात खर्चासाठी घेतला हात आखडता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:02 IST2019-10-19T21:00:24+5:302019-10-19T21:02:39+5:30
Maharashtra Election 2019: निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़

Maharashtra Election 2019: पराभवाच्या छायेने अनेक उमेदवारांचे अवसान गळाले; अंतिम टप्प्यात खर्चासाठी घेतला हात आखडता
नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत १९ आॅक्टोबर हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे़ त्यानंतर दोन दिवसांनी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे़ परंतु, त्यापूर्वीच मतदारसंघातील जनतेच्या कौलाचा अंदाज घेत पराभवाच्या छायेतील उमेदवारांचे अवसान गळाले आहे़ त्यामुळे अशा अनेक उमेदवारांनी खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ खर्चापाणी बंद झाल्याने ऐनवेळी कार्यकर्ते दुसऱ्याच उमेदवाराचा झेंडा हाती घेत आहेत़
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांनी आमदारकीचे स्वप्न पाहत उडी घेतली़ पक्षाकडून तिकीट नाकारल्यानंतरही कार्यकर्त्यांनी दिलेल्या उसन्या अवसानावर रिंगणात उतरले आहेत़ त्यात निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या बजेटचा ताळमेळ घालतानाच अनेकांची दमछाक झाली़ ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत काही उमेदवारांनी तर मुंबईतील फ्लॅट अन् गावाकडच्या शेतजमिनींचा सौदा केला़ दिग्गज उमेदवारांना बजेटची चिंता नसली तरी, ऐनवेळी रोख रक्कम तीही मुबलक प्रमाणात असण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़ अशांच्या मदतीला त्यांचेच हितचिंतक धावून आले़ दिवसेंदिवस निवडणुका महाग होत चालल्या आहेत़ त्यामुळे पैसे खर्च करण्यात हात आखडता घेणारे कार्यकर्ते मग रिंगणात कशाला उतरलात? असे खोचक प्रश्न विचारत आहेत
निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली़ १९ आॅक्टोबर हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे़ त्यामुळे २१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर सभा अन् रॅली काढता येणार नाहीत़ परंतु अंतर्गत प्रचार मात्र सुरु राहणार आहे़ त्यामुळे या काळातही खर्च सुरुच राहील़ परंतु आताच अनेक उमेदवारांचे पराभवाच्या छायेत अवसान गळाले आहे़ त्यामुळे खर्चासाठी हात आखडता घेतला आहे़ त्यामुळे कार्यकर्तेही संतप्त झाले आहेत़ ऐनवेळी या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या उमेदवाराचा झेंडा हाती घेतला आहे़ तर काही उमेदवारांनी थेट अन्य उमेदवाराला पाठींबा दिला आहे़
आमदारकीच्या स्वप्नासाठी संपत्तीची विक्री
निवडणूक म्हटले की, अफाट खर्च आलाच़ निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चासाठी २५ लाखांची मर्यादा घालून दिली असली तरी, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक खर्च करण्यात येतो हे सर्वश्रुत आहे़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हजारो कोटी रुपयांचा चुराडा होतो़ निवडून येण्याची खात्री असलेल्या अनेक उमेदवारांना रोख रकमेची चणचण भासू लागली आहे़ त्यामुळे त्यांनी आपल्याजवळील शेतजमीन, घर, फ्लॅट यांचे सौदे करुन त्याद्वारे रक्कम उभी केली आहे़