Maharashtra Election 2019: Muslim community should show secularism in action: Prakash Ambedkar | मुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्षतेची भूमिका कृतीतून दाखवावी : प्रकाश आंबेडकर 
मुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्षतेची भूमिका कृतीतून दाखवावी : प्रकाश आंबेडकर 

ठळक मुद्देमुस्लीम समाजाने ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे  वंचितांचा विकास करण्याचा आमचा मनोदय मुस्लिम समाजाला आम्ही सोबत घेतले. उमेदवारी देवून निवडून आणून दाखविले. वंचितचा लढा लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी

नांदेड: उमेदवारी देताना समाजाला डावलले जाते म्हणून नाराजी व्यक्त करायची आणि त्याच पक्षाला पुन्हा मतदान करायचे, अशी दुहेरी भूमिका राजकारणात फार दिवस चालत नाही. मुस्लिम समाजाला आम्ही सोबत घेतले. उमेदवारी देवून निवडून आणून दाखविले. वंचित बहुजन आघाडीने आपली धर्मनिरपेक्ष भूमिका कृतीतून  दाखविली. आता मुस्लिम समाजाने भूमिका घ्यायची वेळ आली आहे. आपण खरेच धर्मनिरपेक्ष शक्तीच्या पाठीशी राहणार असाल तर वंचितला बळ द्या. तुम्हाला निराश करणार नाही, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी नांदेड जिल्ह्यात किनवट, भोकर, नांदेड आणि कंधार येथे प्रचारसभा घेतल्या. यावेळी नांदेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर नांदेड दक्षिणचे उमेदवार फारुख अहेमद, नांदेड उत्तरचे उमेदवार मुकुंद चावरे, किनवट येथील उमेदवार प्रा. हमराज उईके, लोहा मतदारसंघातील उमेदवार शिवा नरंगले, भोकरचे उमेदवार नामदेव आईलवाड, देगलूरचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे, नायगावचे उमेदवार मारोतराव कवळे गुरुजी आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

वंचित बहुजन आघाडीची भूमिका अगदी स्पष्ट आहे. तळागाळातील दुर्लक्षित घटकांना सत्तेत आणून वंचितांचा विकास करण्याचा आमचा मनोदय आहे. त्यामुळेच राज्यभरातून वंचित आघाडीला प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिम समाजानेही आता ठोस भूमिका घेऊन आपण धर्मनिरपेक्ष असल्याचे मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यावे, असे ते म्हणाले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपा युतीवरही घणाघाती टीका केली. सत्तेत पाच वर्षे असताना हे सरकार एकाही घटकाला न्याय देवू शकले नाही. जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करुन केवळ स्वत:चे खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर दहा रुपयांत भरपेट जेवण देवू, अशा घोषणा करुन पुन्हा जनतेची धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या भूलभुलैयामध्ये पुन्हा अडकू नका, असे सांगत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करु, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी विशेष उपक्रम राबवू, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देवू, सरकारच्या भेदभाव करणाऱ्या भूमिकेमुळे हजारो आदिवासी, ओबीसी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न करु, असे आश्वासनही अ‍ॅड. आंबेडकर यांनी दिले. 

वंचितचा लढा लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी
युती सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांसाठी कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. उलट या सरकारमुळे अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी समाजाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. राज्यातील सत्ता सध्या मोजक्याच कुटुंबांच्या हातात आहे. ही कुटुंबशाही राजकीय व्यवस्था मोडीत काढून लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याचा वंचितचा हेतू आहे. त्यासाठीच आमचा लढा सुरु असल्याचे सांगत वंचितची सत्ता आल्यास तळागाळातला सर्वसामान्य माणूस मागणारा नाही तर देणारा होईल, असा विश्वासही अ‍ॅड.आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

ओवेसी चांगलेच, पण औरंगाबादेत भाजपाला मदत का?
मुस्लिम समाजाने राजकारणाकडे बारकाईने पहायला हवे. बॅ. असुसोद्दीन ओवेसी चांगला माणूस आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची एमआयएमसोबत युती व्हावी, असे मलाही वाटत होते. परंतु, निवडून दिलेला खासदार आणि त्यांचे साथीदार ओवेसींना वापरायला निघाल्याचा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काय झाले? काँग्रेस आणि भाजपाचा उमेदवार या निवडणुकीत उभा होता. अशावेळी भाजपाला मतदान करा म्हणून ओवेसींनी सांगितले की, महाराष्टÑातील नेतृत्वाने याची विचारणा येथील मुस्लिम समाज करणार आहे की नाही? असा सवाल करीत नरेंद्र मोदींना आम्ही अंगावर घेतो. ते इथलं स्वातंत्र्य, बंधुभाव अबाधित रहावे यासाठी. हीच भूमिका घेऊन अनेकजण लढत आहेत. आज औरंगाबादमधील हे लोक माझ्याकडे विचारणा करीत आहेत की, आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो त्याच भाजपाला आपण निवडून दिलेल्या उमेदवाराने मदत केली  आहे. या लोकांना मी आता काय उत्तर देवू. राजकारणात सगळ्यात मोठे हत्यार हे तुमचे चारित्र्य, तुमची बांधिलकी, इमानदारी असते. ते नसेल तर आघाडी करुन काहीच साध्य होत नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर यावेळी म्हणाले.

Web Title: Maharashtra Election 2019: Muslim community should show secularism in action: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.