Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान;१३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 16:29 IST2019-10-22T16:27:36+5:302019-10-22T16:29:09+5:30
काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ

Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान;१३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद
नांदेड : जिल्ह्यात नऊ मतदारसंघांसाठी सोमवारी काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात जवळपास ६५ टक्के मतदान झाले असून अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यत प्राप्त झाली नव्हती. दरम्यान, या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह प्रदीप नाईक, वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, डॉ. तुषार राठोड, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह जिल्ह्यातील १३५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे.सोमवारी सकाळी सात वाजेपासून जिल्ह्यातील २ हजार ९६२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे उशिरा मतदान सुरु झाले. सकाळी ११ नंतर मात्र पाऊस थांबल्याने सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली.
नांदेड दक्षिण मतदारसंघात राज्यात सर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्या खालोखाल नांदेड उत्तर मतदारसंघात २४ उमेदवार आहेत तर हदगाव आणि किनवट मतदारसंघात प्रत्येकी १५, भोकर मतदारसंघात ७, लोहा १०, नायगाव १२, देगलूर ९ आणि मुखेड मतदारसंघात सर्वात कमी ५ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात लोहा, उमरी, भोकर या मतदारसंघात काही केंद्रावर रात्री नऊनंतरही मतदान सुरु होते. जिल्ह्यात अंदाजे ६५ टक्के मतदान झाले आहे. अंतिम आकडेवारी मात्र रात्री बारा पर्यंतही प्राप्त झाली नसल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मतदान प्रक्रियेनंतर आता २४ आॅक्टोबरला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारीही २२ आॅक्टोबर रोजीही निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा २२ आॅक्टोबर रोजी कर्तव्याचा कालावधी समजावा, त्यांची गैरहजेरी समजण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काढले.
पावसामुळे मतदान केंद्रावर चिखल
विधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी पहाटेपासूनच सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे ११ वाजेपर्यंत मतदार घराबाहेर पडलेच नाहीत़ त्यानंतर मात्र मतदारांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या़ परंतु अनेक मतदान केंद्रावर चिखलातूनच मार्ग काढत मतदारांना आपला हक्क बजावावा लागला़