सर्वच पक्षातील नेत्यांकडून नाराजांच्या गृहभेटी,मोठी जबाबदारी देण्याचे 'गाजर', प्रचारात येतील का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:02 IST2026-01-08T19:02:09+5:302026-01-08T19:02:57+5:30
नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, पक्षाच्या प्रचारात दिसतील का?

सर्वच पक्षातील नेत्यांकडून नाराजांच्या गृहभेटी,मोठी जबाबदारी देण्याचे 'गाजर', प्रचारात येतील का?
नांदेड : महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या उदंड होती. त्यामुळे अनेकांची तिकिटे ऐनवेळी कापण्यात आली. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी देण्यात आली. परिणामी प्रत्येक प्रभागात नाराजांची संख्या लक्षणीय आहे. ही नाराज मंडळी अद्यापही आपल्या पक्षाच्या प्रचारात उतरली नाही. त्यामुळे या नाराजांची मनधरणी करण्यासाठी नेते मंडळी मैदानात उतरली आहे. नाराजांच्या गृहभेटी घेऊन भविष्यात मोठी जबाबदारी देण्याचे गाजर त्यासाठी दाखविण्यात येत आहे; परंतु हे नाराज प्रचारात उतरतील की नाही? याबाबत नेते मंडळीही साशंक आहे.
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक इच्छुक भाजपकडून होते. त्याखालोखाल शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार)कडे विशिष्ट प्रभागातून तिकिटांची मागणी करणारे अधिक होते; परंतु असे असतानाही कोणत्याही पक्षाला सर्वच्या सर्व ८१ जागी उमेदवार देता आले नाही, हे विशेष; परंतु ऐनवेळी निष्ठावंतांचा पत्ता कापण्यात आला. त्यामुळे नाराजांची संख्याही वाढली. यातील बहुतांश मंडळींना बंडखोरी करण्यापासून रोखण्यात आले असले तरी, अद्याप त्या-त्या प्रभागात ही मंडळी पक्षाच्या प्रचारात उतरली नाही.
याबाबत अधिकृत उमेदवारांनी पक्ष नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे नेतेमंडळींकडून नाराजींच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी भविष्यात वेगळी जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे; परंतु नेत्यांच्या या आश्वासनानंतर या मंडळींची नाराजी दूर होते का? याबाबत साशंकता आहे.