नांदेडमध्ये शिंदेसेनेत अंतर्गत ‘रणसंग्राम’; डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द डीसीएम एकनाथ शिंदेंची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:54 IST2026-01-08T18:53:04+5:302026-01-08T18:54:22+5:30
थेट प्रभागातून : ओएसडीच्या पत्नीची उमेदवारी कापली अन् दोन आमदारांत राजकारण पेटले

नांदेडमध्ये शिंदेसेनेत अंतर्गत ‘रणसंग्राम’; डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द डीसीएम एकनाथ शिंदेंची एंट्री
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून, प्रभाग क्रमांक तीनमधील एका जागेवरून सुरू झालेला वाद थेट दोन आमदारांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. या वादावर संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीतही तोडगा न निघाल्याने आता खुद्द शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सत्ताधारी पक्षांची नांदेडात युती होऊ न शकल्याने शिंदेसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोबत जाण्याचा निर्णय घेत बैठकांचा ससेमिरा चालला. मात्र, नांदेड उत्तर मतदारसंघातील जागावाटपावरून वाद निर्माण झाला. त्यातूनच आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मतदारसंघातील १२ प्रभागांमधील एकूण ४८ जागांपैकी ४० जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे केले. दुसरीकडे, नांदेड दक्षिण मतदारसंघात नामदार हेमंत पाटील आणि आमदार आनंद बोंढारकर यांच्या माध्यमातून २९ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर दक्षिणपुरती शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती झाली. त्यामुळे पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार काही उमेदवारांनी माघार घेतली. मात्र, नांदेड उत्तरमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि ओएसडी म्हणून ओळखले जाणारे गजानन पाटील यांच्या पत्नी मीनल पाटील यांच्या उमेदवारीवरून शिंदेसेनेत अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. कल्याणकर यांनी त्यांची उमेदवारी कापून त्या ठिकाणी शहरप्रमुख श्याम कोकाटे यांच्या मातोश्री अरुणा भीमराव कोकाटे यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिली. पक्षाच्या निर्णयानुसार मीनल पाटील यांनी माघार घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी माघार न घेता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. विशेष म्हणजे, त्यांच्या प्रचाराचा नारळ शिंदेसेनेचे उपनेते नामदार हेमंत पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी आमदार बाबूराव कदम आणि अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना पाटील यांनी अपक्ष उमेदवाराला उघडपणे पाठिंबा दिल्याने संपर्कप्रमुख सिद्धराम म्हैत्रे नांदेड दौऱ्यावर आले असता, कोकाटे समर्थकांनी थेट त्यांच्यासमोर राडा घालत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर बैठक घेऊनही संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत या वादावर तोडगा निघाला नव्हता.
‘ही आमचीच उमेदवार’ : हेमंत पाटील आक्रमक
नामदार हेमंत पाटील अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी मीनल पाटील या आमच्या उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांचाच प्रचार करणार, असे ठणकावून सांगितले. तसेच ज्या सच्चा शिवसैनिकांना डावललेले गेले, त्यांचादेखील प्रचार मी एक शिवसैनिक म्हणून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, आमदार कल्याणकर यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन करत, जनतेला माझी कामे माहिती आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रभागात सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या श्याम कोकाटेला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मतदारांना अरुणा कोकाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
शिंदेंचा ‘लाडका आमदार’ वादाच्या केंद्रस्थानी
आमदार बालाजी कल्याणकर हे माझे लाडके आमदार असल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना नांदेडच्या सभेत केले होते. शिंदे यांच्या माध्यमातून नांदेड उत्तरमध्ये जवळपास अडीच हजार कोटींची विकासकामे केल्याचेही सांगितले जाते. मात्र, आजघडीला महापालिका निवडणुकीवरून कल्याणकर आणि नामदार पाटील यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.
लोकल विरुद्ध बाहेरचा : कोणाला फायदा, कोणाला फटका?
गजानन पाटील हे एकनाथ शिंदे यांचे ओएसडी असल्याचा दावा केला जात असला तरी त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पक्षाच्या कोणत्याही अधिकृत नेत्याने ते ओएसडी आहेत की नाही, यावर अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, सांगवी प्रभागातून निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मीनल पाटील गेल्या सहा महिन्यांपासून त्या भागात वास्तव्यास आहेत. विविध सण, समारंभ आणि योजनांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संपर्क वाढवला. मात्र, पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी न देता अरुणा कोकाटे यांना एबी फॉर्म दिल्याने त्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यातून लोकल विरूद्ध बाहेरचा असा वाद सुरू झाला आहे.