शेतकरी कन्या ते नगराध्यक्षा; सुजाता एंड्रलवार यांची किनवटच्या राजकारणात गरूडझेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:41 IST2025-12-25T19:41:36+5:302025-12-25T19:41:59+5:30
सुजाता एंड्रलवार या मूळच्या शेतकरी कुटुंबातील असून, त्या उच्च विद्याविभूषित आहेत.

शेतकरी कन्या ते नगराध्यक्षा; सुजाता एंड्रलवार यांची किनवटच्या राजकारणात गरूडझेप
किनवट : शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या मांडवा (कि.) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित गृहिणी, सुजाता विनोद एंड्रलवार. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने किनवट नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवला. महिला आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करत मांडवा ते किनवट नगरपरिषद असा एक प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला असून, त्या शहराच्या दुसऱ्या महिला नगराध्यक्षा ठरल्या आहेत.
सुजाता एंड्रलवार या मूळच्या शेतकरी कुटुंबातील असून, त्या उच्च विद्याविभूषित आहेत. २००७ मध्ये महिला आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळाली. त्यावेळी गोकुंदा जिल्हा परिषद गटातून त्यांनी ‘उद्धवसेना’ उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या जनसंपर्कामुळे आणि विकासकामामुळे त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली. विशेष म्हणजे, सुरुवातीपासून आजतागायत त्यांनी उद्धवसेनेशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे.
कौटुंबिक पाठबळ आणि राजकीय वारसा...
सुजाता एंड्रलवार यांच्या यशामागे कौटुंबिक पाठबळ देखील तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचे चिरंजीव करण एंड्रलवार हे उद्धवसेनेचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या सक्रियतेमुळे त्यांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची अधिक ऊर्जा आणि दिशा मिळत गेली.
उच्च शिक्षणाचा प्रशासकीय कामात फायदा...
एक गृहिणी ते लोकप्रतिनिधी अशा प्रवासात सुजाता एंड्रलवार यांनी आपल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर केला. उच्चशिक्षित असल्याने त्यांना प्रशासकीय कामकाज समजून घेणे आणि जनतेचे प्रश्न मांडणे सोपे गेले. किनवट नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तत्पर
निवडणूकदरम्यान उद्धवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुजाता एंड्रलवार यांनी वचननामा जाहीर केला. वचननाम्यात नमूद केलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी तत्पर असून, माझ्या कार्यकाळात किनवटच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्षा एंड्रलवार यांनी दिली.