नांदेडमध्ये माजी महापौर पुन्हा मैदानात; ‘हाय व्होल्टेज’ लढतीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:55 IST2026-01-10T17:49:22+5:302026-01-10T17:55:39+5:30
महापालिका रणधुमाळी : अपक्ष उमेदवार अन् जातनिहाय मतदानाचे विभाजन ठरणार निर्णायक

नांदेडमध्ये माजी महापौर पुन्हा मैदानात; ‘हाय व्होल्टेज’ लढतीकडे लक्ष
- श्रीनिवास भोसले
नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारास अवघे चार दिवस शिल्लक असताना शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सत्ताधारी पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने नेत्यांच्याही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्ताधारी घटक पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत विकासाचे श्रेय आणि कोण ताकदवार हे पटवून देण्याचे काम सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, माजी महापौरांच्या लढतीकडे लक्ष लागले असून, सत्ताधारी पक्षानेच एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे.
नांदेड महापालिकेच्या वीस प्रभागातील एकूण ८१ पैकी ८१ जागांवर कोणत्याच पक्षाला उमेदवार देता न आल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. बहुतांश प्रभागांत तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसत असून, अपक्ष उमेदवार अन् जात-धर्माच्या माध्यमातून होणारे मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडते, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी चालविली असून, प्रत्येक उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदारांपर्यंत पोहोचत आहे. माजी महापौर अन् उपमहापौरांसह काही बड्या नेत्यांच्या प्रभागातील लढती चर्चेत आहेत.
प्रभाग ४ : अनुभवी विरुद्ध नव्या चेहऱ्यांची थेट लढत
प्रभाग क्रमांक ४ मध्ये माजी महापौर शैलजा स्वामी पुन्हा एकदा भाजपच्या माध्यमातून नशीब अजमावत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या छाया कानगुले आणि शिंदेसेनेच्या मधुरा हालकोडे रिंगणात आहेत. माजी महापौरांच्या अनुभवाला नव्या चेहऱ्यांचे आव्हान मिळाल्याने येथे तिरंगी लढत रंगली आहे. बदलाची हवा काम करते की अनुभव निर्णायक ठरतो, याकडे लक्ष आहे.
प्रभाग ५ (भाग्यनगर) : माजी महापौर विरुद्ध माजी महापौरांची पत्नी
भाग्यनगर प्रभाग क्रमांक ५ हा यंदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेतील प्रभाग ठरत आहे. भाजपच्या माजी महापौर जयश्री पावडे यांच्याविरोधात शिंदेसेनेच्या रेखा बन, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेहा यादव आणि काँग्रेसच्या ज्योती पांढरे रिंगणात आहेत. ज्योती पांढरे या नांदेडचे पहिले महापौर सुधाकर पांढरे यांच्या पत्नी असल्याने या लढतीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे एमआयएम आणि अपक्ष उमेदवारांचे मतविभाजन विजयाची दिशा ठरवणार असल्याची चर्चा आहे.
प्रभाग ६ : आठ उमेदवार, कुणाची बाजी?
प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी महापौर शिला भवरे भाजपकडून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या लक्ष्मीबाई जमदाडे, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) प्रवेशिका जाधव, उद्धवसेनेच्या ज्योती बगाटे, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी ढगे तसेच तीन अपक्ष असे तब्बल आठ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचे माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले यांच्याविरोधात शिंदेसेनेचे ॲड. विलास भोसले यांनी आव्हान उभे केले आहे. काँग्रेसकडून आनंद पाटील, उद्धवसेनेकडून नवज्योतसिंग गाडीवाले तर एक अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने येथेही मतविभाजन निर्णायक ठरणार आहे.
प्रभाग ८ (शिवाजीनगर) : सत्ताधारी भाजप अन् शिंदेसेना आमने-सामने
शिवाजीनगर अर्थात प्रभाग क्रमांक ८ नेहमीप्रमाणे यंदाही चर्चेत आहे. माजी महापौर मोहिनी येवनकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या परवीन बेगम शेख पाशा, शिंदेसेनेच्या डॉ. निलोफर बेगम शेख फारूख आणि एमआयएमच्या नाजिमा बेगम खाजा सय्यद रिंगणात आहेत. या ठिकाणी सत्ताधारी भाजप अन् शिंदेसेना आमनेसामने आहेत.
प्रभाग १८ : माजी महापौरांची कन्या मैदानात
प्रभाग क्रमांक १८ मध्ये माजी महापौर दीक्षा धबाले यांच्या कन्या मयूरी धबाले मराठवाडा जनहित पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि काँग्रेसचे उमेदवार असल्याने हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला आहे.
अपक्षांची भूमिका ठरणार निर्णायक
एकूणच नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौरांचे प्रभाग केंद्रस्थानी आले आहेत. पक्षीय ताकदीपेक्षा स्थानिक समीकरणे, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. शेवटच्या टप्प्यातील राजकीय डावपेच आणि मतविभाजन कुणाच्या बाजूने झुकते, यावरच नांदेडच्या महापौरांच्या विजयाचे गणित ठरेल, असे सांगितले जात आहे.