नांदेड महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-वंचित एकत्र; जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:24 IST2025-12-30T16:24:18+5:302025-12-30T16:24:43+5:30
या निर्णयामुळे नांदेडमध्ये आता भाजप विरुद्ध काँग्रेस-वंचित अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.

नांदेड महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-वंचित एकत्र; जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर!
नांदेड: महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेडच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपला रोखण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीनुसार काँग्रेस ६१ जागा तर वंचित बहुजन आघाडी २० जागा लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी केली.
भाजप विरुद्ध काँग्रेस-वंचित अशी थेट लढत
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात काँग्रेससोबत जाण्याचे संकेत दिले होते, त्याचे पडसाद आज नांदेडमध्ये उमटले. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबत्त्यांनंतर हा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने काँग्रेसने वंचितसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे नांदेडमध्ये आता भाजप विरुद्ध काँग्रेस-वंचित अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वबळामागे भाजप
पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव ठाकरे यांनी भाजप खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. "भाजपकडून 'तोडा, फोडा आणि निवडणुका जिंका' हे धोरण राबवले जात आहे. काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच डाव खेळत आहे," असा आरोप त्यांनी केला. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष अब्दुल सत्तार आणि वंचितचे शहराध्यक्ष प्रशांत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या नव्या समीकरणामुळे अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.