मतदार कुणाच्या बाजूने? नांदेड महापालिकेच्या रणधुमाळीत ‘आत्मविश्वास विरुद्ध अस्वस्थता’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:25 IST2026-01-12T18:24:22+5:302026-01-12T18:25:04+5:30
प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावत संपूर्ण ताकद प्रचारात झोकली आहे.

मतदार कुणाच्या बाजूने? नांदेड महापालिकेच्या रणधुमाळीत ‘आत्मविश्वास विरुद्ध अस्वस्थता’!
नांदेड : महानगरपालिकेची निवडणूक आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून, प्रचाराचा श्वास रोखून धरणारा अंतिम टप्पा सुरू आहे. तब्बल आठ वर्षांनंतर होणारी ही निवडणूक नांदेडच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार असून, ८१ जागांसाठी ४९१ उमेदवारांनी रणांगण पेटवले आहे.
प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावत संपूर्ण ताकद प्रचारात झोकली आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी अनुभवी, तळागाळात पकड असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. काही प्रभागांत पक्षांतर करून आलेल्या ‘वलयांकित’ उमेदवारांमुळे लढत अधिकच चुरशीची बनली आहे. नेतेमंडळींच्या सभा, कार्यकर्त्यांची फौज, हायटेक प्रचार आणि सोशल मीडियाचा भडिमार यामुळे वातावरण तापले आहे.
मात्र, या झगमगाटाच्या झंझावातात सर्वच उमेदवार टिकून आहेत असे नाही. काही उमेदवारांनी निकाल गृहीत धरत विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी केली आहे, तर काहींना पराभवाची चाहूल लागल्याने अशांनी प्रचारच आटोपता घेतल्याचे चित्र आहे. हा अतिआत्मविश्वास किंवा निराशा ऐनवेळी तिसऱ्याच उमेदवाराच्या फायद्याची ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. महापालिकेत यापूर्वी महत्त्वाची पदे भूषवलेल्या अनेक माजी नगरसेवकांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली आहे. ‘जनता पुन्हा स्वीकारेल का?’ हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करत आहे. विकासकामांचे हिशेब, अपूर्ण आश्वासने आणि आठ वर्षांचा साचलेला रोष मतपेटीत उमटणार का, याची धाकधूक सत्ताकांक्षी गटांना लागली आहे.
१३ जानेवारीच्या रात्री प्रचाराच्या फैरी थंडावणार असल्या तरी छुपा प्रचार मतदानाच्या दिवशीपर्यंत सुरूच राहणार, हे नाकारता येत नाही. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांत मतदान कमी असले तरी निकालाचा टक्का विक्रमी ठरला होता. ‘लक्ष्मीदर्शन’ कारणीभूत ठरल्याची चर्चा झाली होती. महापालिकेतही तशीच पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत अडकलेली महापालिका, रखडलेला विकास आणि बदलाची मतदारांची आस या साऱ्यांचा फैसला आता मतपेटीत होणार आहे. आत्मविश्वास सत्तेपर्यंत नेणार की अस्वस्थता पराभवाचे कारण ठरणार, हे मात्र नांदेडची सुजाण जनता ठरवणार आहे.