अपक्ष उमेदवाराच्या प्रचारावरून नांदेड शिंदेसेनेत रणकंदन; संपर्कप्रमुखांच्या समोरच राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:54 IST2026-01-07T17:52:58+5:302026-01-07T17:54:56+5:30
शिंदेसेनेच्या आमदारातील अंतर्गत कलह पुढे आला.आमदार पाटील आणि आमदार कल्याणकर या दोघांनीही एकमेकांवर शब्द बाण चालविले.

अपक्ष उमेदवाराच्या प्रचारावरून नांदेड शिंदेसेनेत रणकंदन; संपर्कप्रमुखांच्या समोरच राडा
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेसेनेतील आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यात युतीच्या विषयावरून बेबनाव सुरू झाला होता. त्यातून नांदेड उत्तरमध्ये शिंदेसेना स्वबळावर, तर दक्षिणमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासोबत युतीत लढत आहे. त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस कल्याणकर यांनी डावललेल्या अन् अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या मीनल पाटील यांच्या प्रचारावरून चव्हाट्यावर आली. याच प्रकरणावरून मंगळवारी संपर्कप्रमुख सिद्धराम म्हैत्रे यांच्यासमोर सांगवी प्रभागातील शिवसैनिकांनी राडा केला.
खासदार श्रीकांत शिंदेसमर्थक असलेल्या गजानन पाटील यांच्या पत्नी मीनल पाटील यांना महापालिका निवडणुकीत सांगवी प्रभागातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, आमदार बालाजी कल्याणकर यांनी ऐनवेळी त्यांचा पत्ता कापून दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. त्यामुळे मीनल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यात सोमवारी रात्री आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कदम हे बंडखोर मीनल पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरूणा कोकाटे या असताना आमदारच अपक्षाचा प्रचार करीत आहेत. त्यावरून शिंदेसेनेच्या आमदारातील अंतर्गत कलह पुढे आला. या विषयावरून आमदार पाटील आणि आमदार कल्याणकर या दोघांनीही एकमेकांवर शब्द बाण चालविले. दरम्यान, मंगळवारी संपर्कप्रमुख सिद्धराम म्हैत्रे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी सांगवी प्रभागातील शिवसैनिकांनी आमदार हेमंत पाटील यांच्याविरोधात घोषणा देत सिद्धराम म्हैत्रे यांच्यासमोरच राडा केला. यावेळी आमदार कल्याणकर यांनी संतप्त कार्यकर्त्यांना समजावत त्यांना शांत केले.
कट्टर शिवसैनिकांच्या मागे उभा
गजानन पाटील आणि मीनल पाटील यांनी शासनाचे अनेक उपक्रम राबविले आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही. परंतु, त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांचा प्रचार करीत आहोत. शहरात ज्या ठिकाणी कट्टर शिवसैनिकांवर अन्याय झाला असेल, त्यांच्या मागे मी उभा असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच कल्याणकर हे नेते आहेत, मी शिवसैनिक आहे. त्यामुळे माझे ते ऐकतील, अशी माझी अपेक्षा नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
उमेदवारांच्या पाठीशी
पाटील यांना उमेदवारीला शिवसेनेचा एबी फॉर्म लागला नाही. ते शिवसेनेचे आहेत. परंतु, आता त्यांना दुसरी निशाणी मिळाली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांच्या पाठीशी आम्ही असल्याचे आमदार बाबूराव कोहळीकर म्हणाले.
झालेली घटना धक्कादायक
शिवसेनेचे अधिकृत चार उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराचा आमच्याच पक्षाचे दोन आमदार प्रचार करीत आहेत, हे पाहून धक्का बसला. या गोष्टी घडू नयेत. पक्षाने जे उमेदवार दिले ते मान्यच करावे लागतील. त्यांना काय बी फाॅर्म मी दिले नाहीत. सचिवांकडून जिल्हाप्रमुखांकडे हे बी फॉर्म येतात. मी काय माझ्या मनाने बी फाॅर्म लिहितो काय? घरात भांडणे असतील तर येऊन बोलावे. मी लहान आहे, ते मोठे आहेत. बाबूराव कोहळीकर यांनीही माझ्या मतदारसंघात येऊन हस्तक्षेप करणे योग्य नाही. उद्या जर मी त्यांच्या हदगाव मतदारसंघात जाऊन लुडबूड केली तर...? असा संताप आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला.