नांदेड महापालिकेत भाजपचा 'एकला चलो रे' चा नारा; काँग्रेस-उद्धवसेना एकत्र लढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:10 IST2025-12-29T17:05:51+5:302025-12-29T17:10:01+5:30
भाजपाचा रथ रोखण्यासाठी काँग्रेस उद्धवसेनेला सोबत घेवून रणसंग्रामात उतरणार असल्याचे समजते.

नांदेड महापालिकेत भाजपचा 'एकला चलो रे' चा नारा; काँग्रेस-उद्धवसेना एकत्र लढणार!
- अविनाश चमकुरे
नांदेड : नगरपालिका निवडणुकादरम्यान शिंदेसेनेने खेळलेली खेळी भाजप पुन्हा नांदेडमध्ये खेळू पाहत आहे. राज्य नेत्यांच्या आदेशानुसार भाजप, युतीसाठी बैठकांचे सोपस्कार पार पाडले आहेत. आतापयर्यंत पार पडलेल्या जवळपास पाच ते सहा बैठकांमध्ये युतीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. जागा वाटपांवर एकमत न झाल्याने भाजपा नेतृत्वाने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, भाजपाचा रथ रोखण्यासाठी काँग्रेस उद्धवसेनेला सोबत घेवून रणसंग्रामात उतरणार असल्याचे समजते.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीत नेतेमंडळींचे एकमत न झाल्याने त्याचा फटका निकालावर बसला होता. तर स्वतंत्र लढल्याने काही ठिकाणी फायदा झाल्याचेही दिसून आले होते. दोन्ही अनुभव लक्षात घेता महापालिका निवडणुकीत भाजपा व शिंदेसेना एकत्र येणार का? यावरुन राजकीय वर्तुळात मा फेरी झाडत होत्या. परंतु दुसरीकडे युती झाली तर कोणत्या प्रभागातून कोणत्या पक्षाला उमेद्वारी मिळणार याबाबत स्पष्टता नसल्याने नगरसेवक होण्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या इच्छुकांची घालमेल चांगलीच वाढली होती. त्यात वरिष्ठ नेतेमंडळी काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागून होते. भाजपा व शिंदेसेनेकडून एकमेकांवर होत असलेले आरोप व जास्तीत जास्त जागांवर करण्यात येत असलेल्या दाव्यामुळे युती होईल असे वाटत नव्हते. शिंदेसेनेने नांदेड दक्षिणमधून १० तर उत्तरमधून १५ जागांची मागणी केली होती. मात्र भाजपा एकूण ८ पेक्षा जास्त जागा सोडायला तयार नाही.
एकीकडे युतीसाठी चर्चा सुरु असताना दुसरी शक्यता लक्षात घेता गत निवडणुकीत असलेली सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षाने मवाळ भूमिका घेत उद्धवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) शिलेदारांसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. माहितीनुसार महापालिकेतील ८१ जागांपैकी २० जागांवर उद्धवसेनेचे उमेदवार राहतील. उर्वरित जागा काँग्रेस पक्षातील उमेदवार त्यांच्या व्होट बँक लक्षात घेवून लढणार असल्याचे बोलले जात आहे.
आघाडीची घडी बसविण्यासाठी 'ठाकरे' नांदेडात
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये आघाडी होऊ न शकल्यामुळे झालेले मतविभाजन आणि त्यातून झालेले नुकसान टाळण्यासाठी आता महापालिका निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीची बिघडलेली घडी बसविण्यासाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे रविवारी रात्री नांदेडात मुक्कामी आले आहेत. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षातील स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन जागांची वाटाघाटी केली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष हनमंत बेटमोगरेकर, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनीही आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जातील.
वंचितनेही घोषित केले उमेदवार
महापालिका निवडणूकीत एकवेळ काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. मात्र एमआयएमसोबत युती करणार नसल्याचे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, एमआयएमने रविवारी २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा ९ जणांची पहिली यादी रात्री उशीरा घोषित केली आहे.
एमआयएमची पहिली यादी जाहीर
नुकतेच काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी एमआयएममध्ये प्रवेश केला होता. त्यावरून राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच रविवारी एमआयएमने पाच प्रभागांतील २० उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान सोमवारी बहुतांश पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. युती व आघाडी झाल्यास आपला पत्ता कट होण्याचीही इच्छुकांना भीती आहे. त्यामुळे पक्षाने स्वबळावरच निवडणुका लढविण्यासाठी ते उत्सुक आहेत.