कामाला दांडी, अख्खे कुटुंब प्रचारात; सभेस गर्दी जमविण्यासाठी एजंट पुरविणार कार्यकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:32 IST2026-01-08T19:31:32+5:302026-01-08T19:32:09+5:30
सभा, रॅली आटोपल्यानंतरच या कार्यकर्त्यांच्या हातावर पैसे ठेवण्याची खबरदारीही बाळगली जात आहे.

कामाला दांडी, अख्खे कुटुंब प्रचारात; सभेस गर्दी जमविण्यासाठी एजंट पुरविणार कार्यकर्ते
नांदेड : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीच रंगत भरली आहे. परंतु, सर्वच पक्षांकडे कार्यकर्त्यांची वाणवा असून, नेते मंडळींचाच अधिक भरणा झाला आहे. त्यामुळे रॅली आणि सभांना गर्दी जमविण्यासाठी भाडोत्री कार्यकर्ते आणण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शहरात अनेक एजंटही सक्रिय झाले आहेत. एका कार्यकर्त्यासाठी पाचशे रुपये माेजावे लागत आहेत. सभा, रॅली आटोपल्यानंतरच या कार्यकर्त्यांच्या हातावर पैसे ठेवण्याची खबरदारीही बाळगली जात आहे.
सकाळी एका पक्षाचा झेंडा खांद्यावर असलेला कार्यकर्ता सायंकाळी दुसऱ्या पक्षाचे उपरणे गळ्यात घालून फिरताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीत मतदानासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नेते मंडळीसह उमेदवार पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. प्रभागात रॅली काढण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी संख्या दिसण्यासाठी भाडोत्री कार्यकर्ते आणले जात आहेत. त्यासाठी रॅली आणि सभांसाठी प्रत्येक कार्यकर्त्याला पाचशे रुपये द्यावे लागत आहेत. तर, या कार्यकर्त्यांचा जुगाड लावणाऱ्या एजंटला पाच ते दहा हजार रुपयापर्यंत रक्कम उमेदवाराकडून दिली जाते. अशाप्रकारे काही तासातच पाचशे रुपये मिळत असल्याने निवडणूक प्रचार नागरिकांच्या कमाईचे साधन झाले आहे. दिवसात एक ते दोन रॅली, एखादी सभा केल्यास दीड ते दोन हजार रुपये पदरी पडत आहे.
कामाला दांडी, अख्खे कुटुंब प्रचारात
राेजमजुरी करणारी अनेक कुटुंबे निवडणुकीच्या काळात कामाला दांडी मारतात. प्रचारासाठी भाडोत्री कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळे अख्खे कुटुंबच मग वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारात फिरताना दिसत आहे. अंगमेहनतीच्या कामापेक्षा हातात झेंडा घेऊन काही तासातच अधिकचे पैसे मिळत आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश मंडळींना कोणत्या उमेदवाराचा प्रचार करतोय, कोणत्या नेत्याची सभा आहे याचीही कल्पना नसते.
अगोदर होता ३०० रुपये रेट
भाडोत्री कार्यकर्त्यांना प्रचारात आणण्यासाठी यापूर्वी ३०० रुपये दिले जायचे. परंतु, आता ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यातच सभा, रॅली संपल्यानंतर त्यांच्यासाठी खिचडीही व्यवस्थाही करावी लागत आहे.