नांदेडात महायुतीत काडीमोड, सत्ताधारीच राहणार आमने-सामने; काँग्रेसने वंचितला घेतले सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:35 IST2025-12-31T13:34:50+5:302025-12-31T13:35:15+5:30

भाजपने रिपाइं (आठवले) ला सोबत घेऊन त्यांना दोन जागा देत उर्वरित ७९ जागांवर उमेदवार जाहीर केले.

A split in the grand alliance in Nanded, the ruling party will remain face to face; Congress took the deprived along with it | नांदेडात महायुतीत काडीमोड, सत्ताधारीच राहणार आमने-सामने; काँग्रेसने वंचितला घेतले सोबत

नांदेडात महायुतीत काडीमोड, सत्ताधारीच राहणार आमने-सामने; काँग्रेसने वंचितला घेतले सोबत

नांदेड : नांदेड महापालिकेत महायुतीत काडीमोड झाला असून महाविकास आघाडीचीही घडी बसली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी शेवटच्या दिवशी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले पक्ष आता मनपा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दिसतील, असे चित्र नांदेडात आहे. 

नांदेड महापालिकेच्या वीस प्रभागांतील ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रमुख पक्षांनी बंडखोरी रोखता यावी म्हणून शेवटच्या टप्प्यात अधिकृत उमेदवारांच्या अर्जासोबत ‘एबी’ फाॅर्म जोडले. त्यानंतरदेखील अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष, तर काहींनी थेट पक्षच बदलत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. भाजप-शिंदेसेना युतीसाठी नियुक्त समित्यांच्या बैठकांचा ससेमिरा कायम सुरू राहिला. रात्री उशिरापर्यंत बैठकांवर बैठका झाल्या; पण जागावाटपावर तोडगा निघाला नाही आणि भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. 

भाजपने रिपाइं (आठवले) ला सोबत घेऊन त्यांना दोन जागा देत उर्वरित ७९ जागांवर उमेदवार जाहीर केले. शिंदेसेनेच्या दोन्ही आमदारांनी स्वतंत्रपणे उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. यामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी नांदेड उत्तरमधील १२ प्रभागांतील ४८ पैकी ४० जागांवर उमेदवार जाहीर केले. तर आमदार आनंद बोंढारकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील आठ प्रभागांतील ३३ पैकी २९ जागांवर उमेदवार जाहीर केले. दरम्यान, राष्ट्रवादीने (अजित पवार) आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६३ उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसचे नेते खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ६१ उमेदवारांची, तर त्यांच्यासोबत आघाडीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने २० उमेदवारांना संधी दिली. राष्ट्रवादीने (शरद पवार) केवळ २०, तर उद्धवसेनेकडून ३९ जागांवर उमेदवार दिले आहेत.

नांदेडात सत्ताधारी पक्षातच राहणार लढत
आजघडीला अधिकृत उमेदवारांची यादी पाहता नांदेड महापालिकेत सत्ताधारी भाजप- शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) मध्येच लढत होईल, असे चित्र दिसत आहे. काही प्रभागांत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी सत्ताधारी पक्षांना घाम फोडेल, असे चित्र आहे. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

जुन्या-नव्या नेत्यांची गट्टी अन् अंतिम यादी
भाजपकडून उमेदवारी अंतिम करताना जुन्या-नव्या नेत्यांची गट्टी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उमेदवारी अंतिम करताना एकमेकांचे विचार अन् मेरिट लक्षात घेत उमेदवार यादी फायनल केल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये महानगरपालिका निवडणूक प्रमुख खासदार अशोकराव चव्हाण, सहप्रभारी खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

Web Title: A split in the grand alliance in Nanded, the ruling party will remain face to face; Congress took the deprived along with it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.