नांदेडात मतदानासाठी ४ हजार कर्मचारी अन् ३ हजार पोलिसांचा ताफा; ७० बूथ संवेदनशील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:09 IST2026-01-14T18:07:20+5:302026-01-14T18:09:31+5:30
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; नांदेड महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने ६६० मतदान पथके आणि ६० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

नांदेडात मतदानासाठी ४ हजार कर्मचारी अन् ३ हजार पोलिसांचा ताफा; ७० बूथ संवेदनशील
नांदेड : तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २० प्रभागांमधील ८१ जागांसाठी होणाऱ्या या रणसंग्रामासाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली असून, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत ४९१ उमेदवारांचे भवितव्य ५ लाख १ हजार ७९९ मतदार ठरवणार आहेत. मतदानासाठी शहरात एकूण ६०० केंद्रे उभारण्यात आली असून, त्यापैकी ७० केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरून मागवण्यात आलेला १४८१ पोलिसांचा फौजफाटा आणि एसआरपीएफच्या तुकड्यांसह एकूण ३ हजारहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक कामकाजासाठी ६६० मतदान पथके आणि ६० क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह ४ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा आरोग्य विभागानेही जय्यत तयारी केली असून, २५० कर्मचारी आणि प्रत्येक केंद्रावर आशा वर्कर तैनात राहतील. एकूणच, कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि चोख नियोजनासह नांदेड महापालिकेचा हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
निवडणूक आणि पोलिस विभागाची तयारी
नांदेड महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने ६६० मतदान पथके आणि ६० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलिस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांनी समन्वयाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे.
२१० अधिकारी, ३ हजारावर पोलिस कर्मचारी
निवडणुकीच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यासह बाहेरून मागवण्यात आलेले एकूण ३१४३ पोलिस कर्मचारी कर्तव्यावर तैनात असतील. या ताफ्यामध्ये १६६२ स्थानिक पोलिस आणि १४८१ बाहेरील जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण २१० पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व बंदोबस्त शहराच्या विविध भागांत कार्यान्वित असेल. याशिवाय पोलिस दलाच्या मदतीला आणि मतदान केंद्रांवरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १३५० होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरात ७० बूथ संवेदनशील
महानगरपालिका हद्दीतील एकूण ६०० मतदान केंद्रांपैकी ७० केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. या केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस बळ आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. या विशेष केंद्रांवर भरारी पथकांकडून वारंवार गस्त घातली जाणार आहे.
६०४ उपद्रवींना पाठवले जिल्ह्याबाहेर
निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकणाऱ्या ६०४ उपद्रवी व्यक्तींवर प्रशासनाने कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्याबाहेर (हद्दपार) पाठवण्यात आले आहे. शहरात शांतता टिकून राहावी आणि मतदारांमध्ये भीतीचे वातावरण राहू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मतदान केंद्रावर या मिळणार सुविधा
ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची मतदान केंद्रावर सुविधा असेल. ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये यासाठी त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. मतदान केंद्रावर गरोदर महिला आणि लहान मुले सोबत असलेल्या मातांसाठी विशेष सोय असणार आहे. याशिवाय वीज, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, प्राथमिक आरोग्य सुविधेचीही तरतूद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.