नांदेड मनपा निवडणूक अर्ज छाननीत ५९ उमेदवार बाद; ८७८ अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:07 IST2026-01-01T16:07:44+5:302026-01-01T16:07:54+5:30
आता उमेदवारी मागे घेण्याकडे लागले लक्ष

नांदेड मनपा निवडणूक अर्ज छाननीत ५९ उमेदवार बाद; ८७८ अर्ज वैध
नांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत तब्बल ५९ नामनिर्देशन पत्र विविध कारणावरून बाद ठरली आहेत. महापालिकेच्या ८१ जागांसाठी आता ८७८ उमेदवार रिंगणात असून अर्ज माघारीनंतर नेमके किती जण निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल.
महापालिकेसाठी एकूण सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये थाटले असून दि.२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ३ हजार ७१५ अर्जाची उचल करण्यात आली होती. प्रारंभिक पाच दिवसात केवळ ३८ अर्ज दाखल झाले होते. २९ डिसेंबर रोजी २६५ तर ३० डिसेंबर रोजी अंतिम तारखेस तब्बल ९०१ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले होते. एकूण १२०३ नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया विविध कार्यालयात ३१ डिसेंबर रोजी दिवसभर पार पडली. त्यात एकूण ९३७उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८७८ अर्ज वैध ठरले.
अधिकृत एबी फॉर्म जोडलेल्यांचीही मनधरणी
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा अनेकांनी दुसऱ्या पक्षाचा आधार घेत एबी फॉर्म जोडले आहेत. त्यांची ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी माघार घ्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा नाराजांची नाराजी दूर करत त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत विविध पदावर नियुक्त्या दिल्या जात आहेत.
बिलोली पॅटर्न नांदेडातही; मजपा उतरली रिंगणात
नगरपालिका निवडणुकीत नव्यानेच स्थापन झालेल्या मराठवाडा जनहित पार्टीने धर्माबाद, बिलोलीमध्ये चांगले यश मिळवले. तर भोकरमध्ये चार जागा मिळविल्या आहेत. हाच बिलोली पॅटर्न आता नांदेड महापालिकेतही राबविला जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही अथवा ज्यांनी घेतली नाही, अशा बहुतांश जणांनी मराठवाडा जनहित पार्टीचा आधार घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर त्रिशला धबाले यांचे पती विलास धबाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी मराठवाडा जनहित पार्टीकडून उमेदवारी दाखल केली असून त्यांचे नामनिर्देशन पत्र छाननीअंती वैध ठरले आहेत. एकूण किती उमेदवार मजपाने दिले, हे दोन दिवसात कळेल.
सर्वाधिक वैध अर्ज कार्यालय क्रमांक १ मध्ये
प्रती ३ प्रभागांसाठी १ स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापन केले आहे. प्रभाग क्रमांक १, २ व ३ मधून प्राप्त अर्जापैकी १४७ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली, तर दोन अर्ज बाद झाले. प्रभाग क्रमांक ४, ५, ९ मधून १३१ अर्ज वैध तर १६ अवैध ठरली. प्रभाग क्रमांक ६, ७, ८ मधून १४३ अर्ज वैध तर २ बाद ठरले. प्रभाग क्रमांक १०, ११, १२ मध्ये १०० अर्ज वैध तर १२ अवैध ठरले. प्रभाग क्रमांक १३, १४, १५ मधून १५१ उमेदवारी अर्ज वैध तर ४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ मधून ११६ अर्ज वैध तर २० अर्ज बाद ठरले. प्रभाग क्रमांक १९ व २० मध्ये ९० अर्ज वैध तर ३ अवैध ठरली. एकूण अवैध अर्जाची संख्या ५९ आहे.