भंडाऱ्यातील स्फोटाची राज्य सरकारकडून गंभीर दखल ; संरक्षण, पुणे फॉरेन्सिकसह अनेक पथके भंडाऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:42 IST2025-01-30T11:42:18+5:302025-01-30T11:42:49+5:30
स्फोट झालाच कसा, गंभीर दखल : वेगवेगळ्या यंत्रणांकडून वेगवेगळी चौकशी

State government takes serious note of Bhandara blast; Several teams including Defense, Pune Forensic in Bhandara
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत शुक्रवारी २४ जानेवारीला झालेल्या भीषण स्फोटाची राज्य सरकारसोबतच संरक्षण मंत्रालयाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससह वेगवेगळी पथके भंडाराच्या आयुध निर्माणीत धडकली आहेत. हे अधिकारी 'स्फोट झालाच कसा' त्याची चौकशी करीत आहेत. दुसरीकडे पुणे - मुंबईतील फॉरेन्सिकचे पथकही या स्फोटाची चौकशी करीत आहे.
भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत २४ जानेवारीला झालेल्या स्फोटात आठ तरुणांचे बळी गेले, तर पाच जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. संरक्षण मंत्रालयाने आयुध निर्माणीत सुरक्षेच्या उपाययोजनांची (एसओपी) कडक अंमलबजावणी करण्यासंबंधीचे आदेश जारी केले. आयुध निर्माणीत काम सुरू होण्यापासून तो बंद होण्यापर्यंत काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीने काम करवून घ्यायचे, त्याबाबत कडक नियमावली दिली असताना भंडाऱ्यात ही घटना घडली. त्यामुळे त्याची संरक्षण मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या तज्ज्ञांचे एक पथक या स्फोटाची चौकशी करण्यासाठी भंडाऱ्यात पोहचले आहे.
एसआयटीची स्वतंत्र चौकशी
शीर्षस्थ अधिकारी आणि संबंधितांची पथके एकीकडे स्फोटाची कारणे आणि तीव्रता शोधत असतानाच या घटनेला कोण कारणीभूत आहेत, त्याचा तपास भंडारा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे.
एसओपीचे पालन का झाले नाही?
येथे एवढा भीषण स्फोट झाला, म्हणजेच नेमून दिलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचे (एसओपी) पालन झाले नाही. त्यासाठी नेमके कोण कोण जबाबदार आहेत, ते तपासण्यासाठी स्फोटके आणि फायरशी संबंधित स्टेट सेफ्टी ऑफीसरच्या नेतृत्त्वातील एक पथक मुंबईहून येथे दाखल झाले आहे.
पथके दाखल
संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या म्युनिशंस इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक दोन दिवसांपूर्वीच भंडारा येथे दखल झाले आहे. गोळा बारूद, बॉम्ब आणि स्फोटकांच्या तज्ज्ञांचा यात समावेश आहे.
"संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दिल्ली, मुंबई, पुण्यातील वेगवेगळी पथके शीर्षस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चौकशी करीत आहेत. या संबंधाने त्यांची नावे सांगणे योग्य होणार नाही. जखमींना चांगले उपचार देऊन त्यांचे जीव वाचविण्यावर भर दिला जात आहे."
- रमेशकुमार यादव, जनसंपर्क अधिकारी, आयुध निर्माणी, भंडारा