‘ग्रीन चॅनल’अंतर्गत गोंदियात मिळणार कौशल्य विकासाचे धडे

By जितेंद्र ढवळे | Published: May 17, 2024 04:32 PM2024-05-17T16:32:42+5:302024-05-17T16:33:04+5:30

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उपक्रम

Skill development lessons will be given in Gondia under 'Green Channel' | ‘ग्रीन चॅनल’अंतर्गत गोंदियात मिळणार कौशल्य विकासाचे धडे

Skill development lessons will be given in Gondia under 'Green Channel'

नागपूर : राज्य सरकारच्या कौशल्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळाच्या 'ग्रीन चॅनल' या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टीने कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला यांच्याकरिता नागपूर विद्यापीठाच्या वतीने आगामी शैक्षणिक सत्रापासून कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्याच्या अनुषंगाने गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. तीत कौशल्य प्रशिक्षणानंतर रोजगार / उद्योग स्थापन्याकरिता आवश्यक सहायता आणि सुविधा पुरविणे हे सुद्धा या अभियानात अंतर्भूत आहे. या बैठकीला विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, विद्यापीठाच्या आजीवन, अध्ययन व विस्तार मंडळ सदस्या डॉ. कल्पना पांडे, विद्यापीठाच्या रेशीम उद्योग व्यवस्थापन व संशोधन केंद्राचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक सल्लागार डॉ. सुरेश रैना, संचालक डॉ. सुरेश मसराम यांची उपस्थिती होती.

नागपूर विद्यापीठाकडून शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून रोजगाराची साधने उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील गरजवंतांचे राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळच्या 'ग्रीन चॅनल' या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकसित केले जाणार आहे. राष्ट्रीय कौशल्य परिषदेने निश्चित केलेल्या निकषाच्या आधारे गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या सोबत मिळून कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे.

Web Title: Skill development lessons will be given in Gondia under 'Green Channel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.