संरक्षण मंत्रालय, पुणे फॉरेन्सिकसह अनेक पथके भंडाऱ्यात
By नरेश डोंगरे | Updated: January 28, 2025 20:58 IST2025-01-28T20:58:00+5:302025-01-28T20:58:52+5:30
स्फोट झालाच कसा, गंभीर दखल : वेगवेगळ्या यंत्रणांकडून वेगवेगळी चाैकशी

संरक्षण मंत्रालय, पुणे फॉरेन्सिकसह अनेक पथके भंडाऱ्यात
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत शुक्रवारी २४ जानेवारीला झालेला भीषण स्फोटाची राज्य सरकारसोबतच संरक्षण मंत्रालयाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससह वेगवेगळी पथके भंडाऱ्याच्या आयुध निर्माणीत धडकली आहेत. हे अधिकारी 'स्फोट झालाच कसा' त्याची चाैकशी करीत आहे. दुसरीकडे पुण्या-मुंबईतील फॉरेन्सिकचे पथकही या भयावह स्फोटाची चाैकशी करीत आहे.
राज्याच्या एका टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत २४ जानेवारीच्या सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ तरुणांचे बळी गेले तर पाच जण अजूनही मृत्यूशी झूंज देत आहेत. यापुर्वी अशाच प्रकारे पुलगावच्या (जि. वर्धा) दारूगोळा भंडारातही स्फोटाची अशीच भीषण घटना घडली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने आयुध निर्माणीत सुरक्षेच्या उपाययोजनांची (एसओपी) कडक अंमलबजावणी करण्यासंबंधीचे आदेश जारी केले. आयुध निर्माणीत काम सुरू होण्यापासून तो बंद होण्यापर्यंत काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीने काम करवून घ्यायचे, त्याबाबत कडक नियमावली दिली असताना भंडाऱ्यात ही घटना घडली. त्यामुळे त्याची संरक्षण मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या तज्ज्ञांचे एक पथक या स्फोटाची चाैकशी करण्यासाठी भंडाऱ्यात पोहचले आहे. हा स्फोट झालाच कसा, स्फोटाची कारणे कोणती आणि त्याला कोण जबाबदार, त्याची या पथकाकडून कसून चाैकशी केली जात आहे.
पुणे, मुंबईचीही पथके दाखल
संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या म्यूनिशंस इंडिया लिमिटेड (एमआयएल)च्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक दोन दिवसांपूर्वीच भंडारा येथे दखल झाले आहे. गोळा बारूद, बॉम्ब आणि स्फोटकांच्या तज्ज्ञांचा यात समावेश आहे.
एसओपीचे पालन का झाले नाही ?
येथे एवढा भीषण स्फोट झाला, म्हणजेच नेमून दिलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांचे (एसओपी) पालन झाले नाही. त्यासाठी नेमके कोण कोण कारणीभूत आहे, ते तपासण्यासाठी स्फोटके आणि फायरशी संबंधित स्टेट सेफ्टी ऑफिसरच्या नेतृत्वातील एक पथक मुंबईहून येथे दाखल झाले आहे.
एसआयटीची स्वतंत्र चाैकशी
शिर्षस्थ अधिकारी आणि संबंधितांची पथके एकीकडे स्फोटाची कारणे आणि तीव्रता शोधत असतानाच या घटनेला कोण कारणीभूत आहेत, त्याचा तपास भंडारा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे.
संरक्षण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या दिल्ली, मुंबई, पुण्यातील वेगवेगळी पथके शिर्षस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चाैकशी करीत आहे. या संबंधाने त्यांची नावे सांगणे योग्य होणार नाही. जखमींना चांगले उपचार देऊन त्यांचे जीव वाचविण्यावर भर दिला जात आहे.
-रमेशकुमार यादव जनसंपर्क अधिकारी, आयुध निर्माणी, भंडारा.