राज ठाकरे यांनी सतत भूमिका बदलू नये, आपला पक्ष वाढवावा; रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर
By आनंद डेकाटे | Updated: November 16, 2024 20:08 IST2024-11-16T20:08:16+5:302024-11-16T20:08:37+5:30
केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी विदर्भात होते. त्यावेळी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी सतत भूमिका बदलू नये, आपला पक्ष वाढवावा; रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज ठाकरे यांना आपला पक्ष बरखास्त करायची गरज नाही. त्यांनी आपला पक्ष वाढवावा, मीसुद्धा आपला पक्ष वाढवत राहील. परंतु त्यांनी सातत्याने आपली भूमिका बदलवू नये, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइं आठवले चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी विदर्भात होते. त्यावेळी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ‘रामदास आठवले यांच्याप्रमाणे मंत्रिपद मिळत असेल तर मी ते घेणार नाही. उलट माझा पक्षच बरखास्त करेल‘ अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यासंदर्भात आठवले यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रत्युत्तर दिले.
निवडणुकीसंदर्भात बोलताना आठवले म्हणाले, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत वातावरण नाही. त्यावेळी विराेधकांनी संविधान धोक्यात आहे. आरक्षण संपणार, असा चुकीचा प्रचार केला होता. संविधान बदलले जाणार नाही, आरक्षण संपणार नाही, असा दावाही त्यांनी केला. विरोधकांकडून मुस्लीम आणि दलित समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला राजन वाघमारे, बाळू घरडे, डॉ. पूरण मेश्राम, विनोद थूल, अविनाश धमगाये उपस्थित होते.