Prepare for counting at Nagpur's Kalamana Center, ready for administration | नागपूरच्या कळमना केंद्रात मतमोजणीची तयारी पूर्ण ,प्रशासन सज्ज
कळमना येथील मतमोजणीच्या तयारीची पाहणी करतांना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

ठळक मुद्देप्रकियेत एक हजार कर्मचारी सहभागी : ९.३० वाजता येणार पहिल्या फेरीचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता संपूर्ण लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे. येत्या गुरुवार २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूररामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कळमना येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे होणार आहे. त्याची संपूर्ण तयारी झाली असून, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे.


२३ मे रोजी सकाळी ८ मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दोन्ही मतदार संघाच्या मतमोजणीकरिता दोन स्वतंत्र शेड तयार करण्यात आले आहेत. या मतमोजणीच्या कामासाठी सुमारे एक हजार कर्मचारी लागणार असून, या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी प्रथम सकाळी ८ वाजता बॅलेट पेपरची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी एक लोकसभा मतदारसंघासाठी २० टेबल लावण्यात येणार आहे. त्यानुसार सरासरी १७ ते २० राऊंड (फेºयाा) होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने एका फेरीची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाल्याशिवाय दुसºया फेरीला सुरुवात होणार नाही. मतमोजणीचा एक राऊंड पूर्ण होण्यासाठी साधारणत: ४५ ते ५० मिनिटांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालासाठी १५ तासाहून अधिकचा वेळ लागण्याची चिन्हे आहेत. पहिल्या फेरीचा निकाल हा सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. 

व्हीव्हीपॅटची मोजणी सर्वात शेवटी
ईव्हीएमवरील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल. या पाच मतदान केंद्राची निवड एका बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकून करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी पाच चिठ्ठ्या काढतील. ज्या मतदान केंद्राचे नाव आले, त्याच पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल.
या ईव्हीएममधील मतमोजणीही शेवटी
मतमोजणी सुरू असताना कंट्रोल युनिटची बटन दाबूनही निकाल दाखवत नसेल तर अशा मशीन्समधील मतांची मोजणी सर्व मतमोजणी झाल्यानंतर करण्यात येईल. मतदान झाल्यानंतर क्लोजची बटन दाबली नसल्याने ही अडचण निर्माण होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनानुसार क्लोजची बटन दाबून या मशीनमधील मतमोजणी करता येते.
अशा होणार फेऱ्या

नागपूर लोकसभा :

विधानसभा      मतदान केंद्र        फेऱ्या

दक्षिण-पश्चिम       ३७२                   १९
दक्षिण                  ३४४                   १८
पूर्व                       ३३४                   १७
पश्चिम                   ३३१                    १७
उत्तर                     ३५१                   १८
मध्य                      ३०५                  १६

रामटेक लोकसभा
विधानसभा       मतदान केंद्र      फेऱ्या
काटोल               ३२८                   १७
सावनेर               २६४                   १९
हिंगणा                ४३३                   २२
उमरेड                ३८३                   २०
कामठी               ४८०                  २४
रामटेक              ३५७                  १८

सकाळी ६ वाजता उघडणार स्ट्राँग रुम
कळमना येथील स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच आहे. यामध्ये सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि स्थानिक पोलीस, अशी तीनस्तरीय व्यवस्था आहे. याशिवाय परिसरात दीडशेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही स्ट्राँग रुम आता गुरुवार २३ मे रोजी सकाळी ६ वाजता राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. यानंतर ईव्हीएम मतमोजनीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पोहोचविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लोकसभेच्या रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट यार्ड परिसरात करण्यात येणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी घेतला.
कळमना मार्केट परिसरातील दोन मोठ्या दालनामध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून, रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
पत्रकारांसाठी माध्यम केंद्र सुरु करण्यात आले असून, या केंद्रांमध्ये संगणक तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतमोजणीची सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरने होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणी होणार असून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.
यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उपजिल्हाधिकारी ररवींद्र कुंभारे, जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तायडे तसेच विविध विभागांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अधिकृत पासधारकांनाच प्रवेश, मोबाईल नेण्यास निर्बंध
मतमोजणीच्या परिसरालासुद्धा तीनस्तरीय विशेष सुरक्षा राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रांमध्ये कुणालाही मोबाईल नेण्यास निर्बंध असल्यामुळे सर्व मतमोजणीसंबंधी अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांच्या नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी या परिसरात येताना मोबाईल सोबत आणू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.


Web Title: Prepare for counting at Nagpur's Kalamana Center, ready for administration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.