१ जुलैपासून पेंच, बोर, उमरेड–करांडला मुख्य सफारी बंद!
By शुभांगी काळमेघ | Updated: June 25, 2025 17:56 IST2025-06-25T17:55:31+5:302025-06-25T17:56:26+5:30
मुख्य दरवाजे बंद, बफर झोन खुला : पावसात सफारीचं नवीन शेड्युल

Pench, Bor, Umred-Karandla main safari closed from July 1!
नागपूर : राज्यात पावसाळ्याला सुरुवात होताच वन विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वन्य प्राण्यांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच पावसाळा वन्यजीव प्रजनन कालावधी असल्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १ जुलै २०२५ पासून पेंच, बोर व उमरेड–पौनी–करांडला अभयारण्यातील मुख्य जंगल सफारी पूर्णपणे बंद राहणार आहे. हा निर्णय पुढील सूचना निघेपर्यंत लागू असेल. सिलारी, खुर्सापार, करांडला आणि गोठंगाव हे मुख्य प्रवेशद्वार या कालावधीत बंद असतील. या दरम्यान या क्षेत्रांमध्ये कोणतीही सफारी होणार नाही.
बफर झोनमध्ये सफारीला परवानगी
मुख्य क्षेत्र बंद असले तरी बफर झोनमधील सफारी सुरू राहणार आहे. पेंचच्या बफरमध्ये अनेक पर्यटक जंगलातील हिरवळ, पक्षी निरीक्षण आणि वन्य प्राण्यांचा अनुभव घेण्यासाठी आकर्षित होतात.
बुकिंगची प्रक्रिया
- बफर झोनमध्ये सफारीसाठी ऑनलाइन बुकिंग उपलब्ध नाही.
- सर्व बुकिंग स्थानिक गेटवर प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑफलाइन पद्धतीने करावे लागेल.
- पावसामुळे रस्त्यांची स्थिती खराब असल्यास सफारी रद्द होण्याची शक्यता राहते.
पर्यटकांसाठी सूचना
- पावसाळी तयारी करून यावे (रेनकोट, छत्री, चांगली पावसाळी चप्पल)
- कीटक प्रतिबंधक औषधे, टॉर्च आणि आवश्यक औषधे बरोबर ठेवावीत
- सफारी दरम्यान वनविभागाच्या नियमांचे पालन करावे