Maharashtra Assembly Election 2019: South Nagpur: 'South' Express Slow! Voting 50.80% | Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण नागपूर  : दक्षिण एक्स्प्रेस स्लो! मतदान ५०.८०%

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण नागपूर  : दक्षिण एक्स्प्रेस स्लो! मतदान ५०.८०%

ठळक मुद्दे१० ते १२ ठिकाणी ईव्हीएम बंद : सकाळी ९ वाजतापर्यंत गर्दी कमी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ३.४७ टक्क्यांनी मतदान कमी झाले. २०१४च्या निवडणुकीत ५३.२७ टक्के मतदान झाले होते. यावेळी जवळपास ५०.८० टक्के मतदान झाले आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघातील बीडीपेठ येथील ताजबाग उर्दू शाळेतील ३५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम बंद पडले. यामुळे मतदारांना एक तास रांगेत राहावे लागले. १० ते १२ केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. दिघोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात रांगेत न लागता मतदानासाठी जाण्यावरून वाद निर्माण झाला होता. अशा किरकोळ घटना सोडल्यास मतदानादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. सर्वच मतदान केंद्रांवर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. युवक आणि वृद्धांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदारांची गर्दी कमी होती. त्यानंतर गर्दी वाढली. काही केंद्रावर ती सायंकाळी ६ वाजतापर्यंत कायम होती. रिंगरोडवरील मेजर जकाते शाळा येथील मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या. लाल बहादूर शास्त्री हनुमाननगर, तनिष्क नर्सिंग स्कूल, सई कोचिंग क्लासेस, ताजबाग सादीक उर्दू हायस्कूल आदी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती.
ईव्हीएममध्ये बिघाड; मतदार रांगेत
मतदानाला सुरुवात होताच बीडीपेठ येथील ताजबाग उर्दू शाळेतील ३५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडले. यामुळे मतदारांना रांगेत उभे राहावे लागले. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. ८ वाजता तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला अशी माहिती अब्दुल रज्जाक काजी यांनी दिली. नागपूर दक्षिण विधानसभा क्षेत्रात ईव्हीएममध्ये किरकोळ बिघाड निर्माण होण्याच्या १० ते १२ घटना घडल्या. परंतु माहिती मिळताच तातडीने ईव्हीएम दुरूस्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.
सामान्यांनी आमची प्रेरणा घ्यावी
साठी गाठलेल्या व आजारपणामुळे स्वत:च्या पायावर उभे होऊ न शकणाºया कमल उठाणे यांनी दिघोरी शाळेत येऊन मतदान केले. त्या म्हणाल्या, मतदान करण्यासाठी शासनाने आज सुटी जाहीर केली. परंतु याचा फायदा अनेक जण घेत नाही. काही घरीच झोपून राहतात तर काही सहलीला जातात. मात्र, मतदानासाठी अर्ध्या तासाचा वेळ काढीत नाही. याबाबत शासनाने गंभीर विचार करणे आवश्यक आहे. आम्ही येऊ शकतो ते का नाही, हा विचार चीड निर्माण करणारा आहे. नंतर हेच लोक चांगला उमेदवार निवडून आला नसल्याची ओरड करतात. हे थांबायला हवे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
‘क्लिक’ करण्यापूर्वीच यादीतून ‘डिलिट’
नेहमीप्रमाणे यावर्षीही मतदारयादीतील घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यात एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. रामबाग वसाहतीतील सुनील जवादे यांचे मतदान उंटखाना येथील मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत होते. केंद्राच्या बाहेर असलेल्या बुथवरील यादीत भाग क्रमांक ४८ मध्ये अनु. क्रमांक ९२२ वर त्यांचे नाव होते. मतदानासाठी केंद्राच्या आत गेल्यावर तेथील अधिकाऱ्याने मात्र जवादे यांच्या नावासमोर ‘डिलिट’ असे लिहिले असल्याचे दाखविले. त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले. जवादे यांनी या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या केंद्रावर जवादेसारख्या आणखी काही मतदारांना या समस्येला तोंड द्यावे लागले.
बोटाची शाई हात धुताच निघाली!
ममता सुगध बडगे यांनी दादासाहेब ठवरे हायस्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ३०७ येथे मतदान केले. घरी गेल्यानतंर त्यांनी हात धुताच बोटाला लावण्यात आलेली शाई निघाली. मतदान केल्याची कोणत्याही प्रकारची निशाणी त्यांच्या बोटावर नव्हती. धुतल्याने हाताची शाई निघाल्याची माहिती त्यांनी दिली.

रांगेत लागण्यावरून वाद
दिघोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर नागरिक मतदानासाठी रांगेत उभे असताना मतदानासाठी आलेले शेरसिंग यादव यांनी रांगेत न लागता थेट मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न केला. याला रांगेतील लोकांनी विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. गोंधळामुळे लगेच पोलीस आले. त्यांनी मध्यस्ती करून वाद मिटवल्यावर मतदान शांततेत पार पडले.
अपघातानंतरही केले मतदान
चिंतेश्वर वाडीभस्मे व शेख इक्बाल शेख जमिल या दोघांचाही वेगवेगळ्या घटनेमध्ये अपघात झाला. जखमी असतानाही या दोन्ही युवकांनी मतदानाचा हक्क बजावला. चिंतेश्वर या युवकाच्या उजव्या हाताचे हाड तुटले. त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी प्लास्टर बांधले आणि थेट दिघोरी शाळेत जाऊन मतदान केले. शेख इक्बाल अपघातात जखमी झाल्यानंतरही त्यांनी ताजबाग येथील सादिक उर्दू हायस्कूल येथे मतदान केले.
पहिल्या मतदानाचा आनंद वेगळा
लता मंगेशकर कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला असलेल्या नेहा जैन हिने पहिल्यांदा मतदान केले. रामेश्वरी रोडवरील मनपाच्या कुंजलीलापेठ नवीन बाभुळखेडा शाळेत तिने मतदान केले. ‘लोकमत’शी बोलताना नेहा म्हणाली, पहिल्या मतदानाचा आनंद वेगळाच आहे. त्या जबाबदारीची व्याप्तीही कळली आहे. कोणता उमेदवार योग्य आहे, जो प्रशासन चालवू शकेल याचा अभ्यास करूनच आज मतदानाला पुढे गेले. योग्य उमेदवाराला मतदान केले याचे समाधान आहे.
तरुणींमध्ये उत्साह
नवीन मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणींमध्ये उत्साह होता. रांगेत उभे राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना यादीतील नावे शोधून देण्यापासून मतदारांना घरोघरी व्होटर स्लीप वाटण्याचे काम तरुणांनी केले. मतदान केंद्राबाहेर विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचे बूथ लावले होते. यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला होता. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता होती. सुदैवाने पाऊ स आला नाही.
मध्य प्रदेशातील विशेष सुरक्षा जवान


सर्वच मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र नागपूर दक्षिण मतदार संघातील ताजबाग येथील सादीक उर्दू हायस्कू ल येथे मध्यप्रदेशच्या विशेष सुरक्षा दलातील सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर मतदारांची फारशी गर्दी नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीने जवान तैनात होते.


दक्षिण नागपूर
४एकूण मतदार ३,८२,२३८
४पुरुष १,९२,१३९
४महिला १,९0,१९८
४मतदान केंद्र ३४४

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: South Nagpur: 'South' Express Slow! Voting 50.80%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.