Maharashtra Assembly Election 2019: Rahul Gandhi should clarify his role on Article 370: Amit Shah | Maharashtra Assembly Election 2019 : कलम ३७० वर राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट करावी  : अमित शहा
Maharashtra Assembly Election 2019 : कलम ३७० वर राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट करावी  : अमित शहा

ठळक मुद्देकाँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा लावला आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्क
खापरखेडा (नागपूर) : देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ‘कलम ३७०’च्या मुद्यावरून हल्लाबोल केला. काँग्रेसने ‘कलम ३७०’ हटविण्याला विरोध केला आहे. जर परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच शहा यांनी दिले. सावनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार व कामठी मतदारसंघातील उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.


खापरखेड्याजवळील चनकापूर येथे झालेल्या महाजनादेश संकल्प सभेदरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री व भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक धोटे, अशोक मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. अगोदर दहशतवादी हल्ला झाल्यावर केवळ निंदा व्हायची. मात्र ५६ इंच छाती असलेल्या नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. आता दहशतवाद्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारले जाते. असे केवळ अमेरिका व इस्रायल हेच देश करायचे. आता भारतदेखील त्या पंक्तीत जाऊन बसला आहे. देशाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना पोटशूळ उठला. ते ‘व्होटबँक’ राजकारण करीत आहे. मात्र आमच्यासाठी सत्तेहून देशहित मोठे आहे. काश्मीरमध्ये एकही गोळी चालली नाही व स्थिती शांतीपूर्ण आहे. काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असा आरोप शहा यांनी लावला. 
स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचा सन्मान आहेत. त्यांचा अपमान करण्याची काँग्रेस नेत्यांची हिंमत कशी होते, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील देशभक्तांची टोळी व दुसरीकडे राहुल गांधी-शरद पवार यांच्या घराणेशाहीचा कंपू असे चित्र आहे. आघाडी शासनाच्या काळात रसातळाला गेलेल्या महाराष्ट्राला पाच वर्षांत पहिल्या पाच क्रमांकात आणल्या गेले आहे.
पवारांना ‘भाजयुमो’चे पदाधिकारी हिशेब देतील
यावेळी अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. शरद पवार यांच्या पक्षाने केवळ भ्रष्टाचारच केला. पवार यांनी नागपुरातील कुठल्याही चौकात येऊन त्यांच्या कार्यकाळातील १५ वर्षांच्या कामाचा हिशेब द्यावा. आमच्या ‘भाजयुमो’चा कुठलाही तरुण पदाधिकारी त्यांना मागील पाच वर्षांच्या कामाचा हिशेब देईल, असे शहा म्हणाले. अजित पवार यांनी सिंचनासाठी ७२ हजार कोटी खर्च केले, मात्र एक ‘हेक्टर’देखील सिंचन होऊ शकले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १९ हजार गावांना जलसंपन्न केले, असेदेखील शहा म्हणाले.
शहा यांनी बावनकुळे यांच्या खात्याचे केले कौतुक
यावेळी अमित शहा यांनी राज्यात झालेल्या कामांची यादीच वाचून दाखविली. यात समृद्धी महामार्ग योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सिंचन योजना, जलयुक्त शिवार, शिक्षणक्षेत्रातील प्रगती इत्यादींचा समावेश होता. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऊर्जाखात्याच्या कामाचेदेखील कौतुक केले. वीजउत्पादन वाढविण्यासोबतच राज्य लोडशेडिंगमुक्त झाले आहे, असे शहा म्हणाले. पाच वर्षांतील कामांची यादी पूर्णपणे वाचली तर सात दिवसांचा भागवत सप्ताहच होईल, असेदेखील ते म्हणाले.


Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Rahul Gandhi should clarify his role on Article 370: Amit Shah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.