Maharashtra Assembly Election 2019 : उत्तर नागपूर :'उत्तर'मध्ये प्रश्न अनेक : मतदान ५१.११ %

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 02:49 AM2019-10-22T02:49:19+5:302019-10-22T02:50:44+5:30

उत्तर नागपूर मतदार संघात सकाळी मतदारांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह नव्हता. दुपारपर्यंत असेच चित्र होते. परंतु दुपारनंतर महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या. सायंकाळी मतदानाने जोर पकडला.

Maharashtra Assembly Election 2019: North Nagpur: Multiple Questions in North: Voting 51.11% | Maharashtra Assembly Election 2019 : उत्तर नागपूर :'उत्तर'मध्ये प्रश्न अनेक : मतदान ५१.११ %

Maharashtra Assembly Election 2019 : उत्तर नागपूर :'उत्तर'मध्ये प्रश्न अनेक : मतदान ५१.११ %

Next
ठळक मुद्देईव्हीएम बंद : १५ व्हीव्हीपॅट बदलले

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपूर मतदार संघात सकाळी मतदारांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह नव्हता. दुपारपर्यंत असेच चित्र होते. परंतु दुपारनंतर महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या. सायंकाळी मतदानाने जोर पकडला. पहिल्या दोन तासात केवळ ७.३६ टक्के इतके मतदान झाले. त्यानंतर ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के, १ वाजेपर्यंत २४.१० टक्के, ३ वाजेपर्यंत ३०.९५ टक्के, ५ वाजेपर्यंत ४६.७७ आणि शेवटी ५१.११ टक्के इतके मतदान झाले. यंदा मतदार यादीतील घोळाच्या तक्रारी अपवाद सोडल्यास कुठेच दिसून आल्या नाहीत. मात्र ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी सर्वत्रच होत्या. संपूर्ण मतदार संघात १५ व्हीव्हीपॅट, २ बॅलेट युनिट आणि दोन कंट्रोल युनिट बदलङ्मवण्यात आले. तर एका मतदाराला बॅलेटद्वारे (टेंडर) मतदान करण्याची परवानगी मिळाली. काही किरकोळ घटना सोडल्यास संपूर्ण मतदान शांततेत पार पडले. मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत, भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने आणि बसपाचे उमेदवार सुरेश साखरे यांनी सकाळीच परिवारासह आपापल्या मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान केले. प्रमुख उमेदवार हे स्वत: संपूर्ण मतदार संघातील ज्या ज्या मतदान केंद्रावर तक्रारी ऐकायला येत होते, तिथे जाऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करताना आढळून आले. मतदान संथगतीने सुरू असले तरी किदवई प्राथमिक शाळा, मोहनलाल रुघवानी सिंधी हिंदी हायस्कूलसह अनेक मतदान केंद्रांमध्ये सायंकाळी ५.४५ वाजताही मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. एकूण ५१.११ टक्के मतदान झाले. मागच्या वेळी ५३.६० टक्के इतके मतदान झाले होते. यंदा २ टक्के मतदान कमी झाले आहे. कमी झालेले मतदान हे कुणाला फायद्याचे आणि कुणाला नुकसानकारक ठरेल, हे येत्या २४ तारखेलाच समजेल.
ईव्हीएम सकाळी ८ वाजेपर्यंत सुरूच झाली नाही
मतदार संघात सर्वाधिक तक्रारी या ईव्हीएम मशीन काम करीत नसल्याच्या होत्या. संपूर्ण मतदार संघात १५ व्हीव्हीपॅट, २ बॅलेट युनिट आणि दोन कंट्रोल युनिट बदलविण्यात आले. महात्मा गांधी सेंटेनियल स्कूल जरीपटका येथील खोली क्रमांक ६ येथील ईव्हीएम मशीन सकाळी ८ वाजेपर्यंत सुरूच झाली नाही. सकाळी कर्मचाऱ्यांच्या चुकीने क्लोज बटन दाबल्या गेल्याने ती सुरू झाली नव्हती. इंजिनियरला बोलावण्यात आले. परंतु त्यांनी हात लावण्यापूर्वीच ८ वाजता ती सुरू झाली नाही. त्यामुळे मतदारांना रांगेत राहावे लागले. असाच काहीसा प्रकार किदवई प्राथमिक शाळेत घडला. येथील ईव्हीएम मशीन तब्बल दोन तास बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. परंतु अधिकाऱ्यांनी मात्र केवळ १५ मिनिट बंद असल्याचे सांगितले.
सखी व आदर्श मतदान केंद्राने वेधले लक्ष 


निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र ठेवले होते. उत्तर नागपुरातील सखी मतदान केंद्र हे हरिकिसन पब्लिक स्कूल बेझनबाग खोली क्रमांक १ येथे ठेवण्यात आले होते. या मतदान केंद्रात पोलीस कर्मचाºयांपासून तर सर्व निवडणुकीतील कर्मचारी महिला होत्या. हे केंद्र विविध प्रकारच्या फुग्यांनी सजविण्यात आले होते. मतदानासाठी येणारा प्रत्येक जण या केंद्राला कुतूहलाने पाहत होता. त्याचप्रकारे विनियालय हायस्कूल मार्टिननगर येथील खोली क्रमांक ७ हे केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले होते. हे खºया अर्थाने आदर्श असेच होते. मुळातच या शाळेत सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. यातच निवडणूक आयोगाने मतदारांसाठी केलेल्या विशेष सुविधाही होत्या. उदाहरणार्थ दिव्यांगांसाठी विशेष व्हीलचेअरपासून सर्व प्रकारच्या सुविधा होत्या. त्यांच्याकडून फिडबॅक मिळावा म्हणून येथे तशी सुविधाही होती.
दोन्ही पाय व हात नाही तरीही मतदानाचा हक्क बजावला
मतदानासाठी दिव्यांगांमध्येही मोठ्या प्रमाणावर उत्साह होता. नारा रोडवरील सावित्रीबाई फुलेनगर येथील श्री साई पॅरेंट योगिराज गजभिये हे ५० वर्षांचे व्यक्ती दोन्ही पाय व हातांनी अपंग आहेत. ते जन्मजात अपंग आहेत. त्यांना चार बहिणी आहेत. दोघींचे लग्न झाले. दोन बहिणी त्यांचा सांभाळ करतात. १२ वी शिकलेले योगिराज यांचा मतदान करण्यासाठी असलेला उत्साह पाहिला तर ते हाता-पायांनी अपंग आहेत. परंतु विचारांनी मात्र अपंग नाहीत, असेच दिसून आले. विकास हवा असेल. व्यवस्था बदलवायची असेल आणि बदल घडवायचा असेल तर केवळ बोलून चालणार नाही, तर त्यासाठी मतदान करावे लगले, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी अशा अवस्थेतही मतदान केले आणि वेळ न चुकता मतदान करतात. त्यांची बहीण ई-रिक्षा चालवते. त्यांच्या रिक्षात बसूनच ते मतदानासाठी आले होते. त्याचप्रकारे लष्करीबाग येथील पिवळी शाळा मतदान केंद्रात पवन दयाराम बोरकर या दिव्यांगाने मतदानाचा हक्क बजावला.
मतदार महिला,फोटो पुरुषाचा
इंदोरा येथील नागसेन विद्यालय येथील राजस प्रभाकर बावनगडे या महिला मतदानासाठी गेली. तेव्हा मतदार यादीमध्ये त्यांच्या नावावर एका पुरुषाचे छायाचित्र होते. त्यामुळे त्यांना मतदानापासून रोखले गेले. याबाबत बसपाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार सुरेश साखरे यांना माहिती होताच ते आपल्या पदाधिकाऱ्यांसह पोहोचले. त्यांनी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना महिलेचे मतदान ओळखपत्र बरोबर असल्याचे सांगितले. ही चूक निवडणूक विभागाची असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर मतदान केंद्रावरील पोलिंग एजंट यांनीसुद्धा ओळख पटविल्यानंतर महिलेला मतदान करता आले.
ज्येष्ठ नागरिकांमध्येही उत्साह
मतदानासाठी दिव्यांगांबरोबर ज्येष्ठ नागरिकांमध्येही उत्साह दिसून आला. मीराबाई ढोलवानी या ८६ वर्षाच्या महिलेला चालताना त्रास होत असतानाही त्या भदंत धम्मकीर्ती विद्यालय अमरज्योतीनगर नागसेनवन नारा रोड येथे मतदानासाठी आल्या. त्याच प्रकारे गुरुनानक स्कूल येथील मतदान केंद्रात शांताबाई भिवगडे य ८० वर्षाच्या महिलेने मतदान केले. तर इंदिरा कॉलनी जरीपटका येथील ईश्वरीदेवी जग्यासी या ९४ वर्षीय महिलेने ई-रिक्षाने येऊन महात्मा गांधी सेंटेनियर स्कूल येथे मतदान केले.
एकाचे मत दुसऱ्याला गेल्याचीही तक्रार
उत्तर नागपुरात यंदा मतदार यादीतील घोळाच्या तक्रारी नव्हत्या. परंतु ईव्हीएमच्या तक्रारी मात्र मोठ्या प्रमाणावर दिसून आल्या. ईव्हीएम मशीन खूप संथ चालत आहे, अशा तक्रारी होत्या. किदवई प्राथमिक शाळा येथे ईव्हीएम मशीन बंद पडले आणि पंजाला दिलेले मत कमळला जात असल्याची तक्रार खुद्द काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्या पत्नी सुमेधा राऊत यांनी केली. यासंदर्भात किदवई प्राथमिक शाळेतील एकमेव केंद्राचे प्रीसायडिंग आॅफिसर राजेंद्र खंडाळ यांना विचारणा केली असता, त्यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. या केंद्रावर १२९० मतदार आहेत. एकच केंद्र आहे. व्हीव्हीपॅटमुळे उशीर होत आहे. १.५० वाजता मशीन बंद पडली. इंजिनियरला बोलावण्यात आले. त्यांनी २.०५ मिनिटांनी ती बदलवून दिली. त्यानंतर सुरळीत मतदान सुरू असल्याचे ते म्हणाले.
‘बॅलेट’द्वारे मतदान
नवी मंगळवारी पोलिंग स्टेशनअंतर्गत चार खंबा येथील किदवई प्राथमिक शाळेतील केंद्रावर मो. आबीद अन्सारी हा मतदार मतदान करण्यासाठी आला, तेव्हा त्याच्या नावावर अगोदरच मतदान झाल्याचे आढळून आले. मो. आबीद यांनी आपण मतदान केले नसल्याचे सांगितले. त्यांनी स्वत:ची ओळख पटविणारे पुरावे सादर केले. येथील प्रीसायडिंग ऑफिसर राजेंद्र खंडाळ यांनी सर्व पुरावे तपासून पाहिल्यानंतर त्याला बॅलेटद्वारा मतदान करू दिले. परंतु असाच प्रकार विजय बळीराम पाटील यांच्याबाबत घडला. ब्लॉसम पब्लिक स्कूल कामगारनगर येथील मतदान केंद्रावर त्यांच्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केले होते. त्यांनी याबाबत तक्रार केली.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये उत्साह
नवमतदारांमध्येही मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. इंदोरा चौकातील नागसेनवन विद्यालय येथील मतदान केंद्रामध्ये श्रांशू पारसमणी झाडे या तरुणीने यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. बीएस्सी करीत असलेल्या श्रांशूने पहिल्यांदा मतदान करीत असल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगितले. आपला अधिकार मिळवायचा असेल तर प्रत्येकाने मतदान करायलाच हवे, असे तिचे म्हणणे आहे. त्याचप्रकारे सक्षम घरडे यानेही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.

४एकूण मतदार ३,८४,५९४
४पुरुष १,९५,३९५
४महिला १,८९,१५९
४मतदान केंद्र ३६०

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: North Nagpur: Multiple Questions in North: Voting 51.11%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.