Maharashtra Assembly Election 2019: Emphasis on improving living standards of Nagpur: Ashish Deshmukh | Maharashtra Assembly Election 2019 : नागपूरकरांचे राहणीमान सुधारण्यावर भर देणार : आशिष देशमुख
Maharashtra Assembly Election 2019 : नागपूरकरांचे राहणीमान सुधारण्यावर भर देणार : आशिष देशमुख

ठळक मुद्देसहकारनगर परिसरात नागरिकांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकर जनतेचे राहणीमान उंचवावे, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असून, त्यांच्या राहणीमानात लक्षणीय वाढ करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.
शुक्रवारी सहकारनगर येथील विमानतळ परिसरातील नागरिकांसोबत तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत लहान बैठकांद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्कादरम्यान ते म्हणाले, दिल्ली सरकारच्या धर्तीवर महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन, त्या शाळांचे संगणकीकरण करून व संरचनेत वाढ करून शिक्षणाची गुणवत्ता वाढवू. शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवू.
चांगल्या उपचारासाठी मोठ्या डॉक्टरांची चमू आणून व येथील कर्मचाऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण देऊ. महानगरपालिकेच्या डिस्पेन्सरीमध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलच्या सहाय्याने मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. गरीब रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक उपकरणांद्वारे सुपरस्पेशालिटी उपचार सेवा, दरवर्षी नि:शुल्क अभियान, कॅन्सरसह अन्य आजारांसाठी विशेष शिबिरे, व्यसनमुक्तीसाठी जनजागृती कार्यक्रम आदींचे नियोजन त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, काटोल फेस्टिव्हलच्या धर्तीवर नागपूर फेस्टिव्हल सुरू करून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहित करू. दीक्षाभूमी, ताजबाग, गुरुद्वारा, पुरातन मंदिरे यांचा तीर्थक्षेत्र म्हणून कायापालट करू. बेरोजगार युवकांना पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता व महिलांच्या लघुउद्योगांसाठी तीन वर्षे करमाफी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मोठ्या रोजगार निर्मितीसाठी मिहान, सेझ, एमआयडीसीमध्ये नवीन गुंतवणूक आणून नागपूरला औद्योगिक नगरी बनविण्याचा संकल्प डॉ. आशिष देशमुख यांनी केला.


Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Emphasis on improving living standards of Nagpur: Ashish Deshmukh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.