मनपाच्या ईंग्रजी शाळांचा प्रस्ताव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:29 IST2020-09-07T19:23:14+5:302020-09-07T19:29:13+5:30
आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळा इंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती असल्याने हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.

मनपाच्या ईंग्रजी शाळांचा प्रस्ताव बारगळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळाइंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती असल्याने हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.
पटसंख्या वाढीला मदत
२०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई पॅटर्ननुसार सहा शाळा सुरू करण्यात येणार होत्या. मनपा सभागृहातही सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र कोविड-१९ मुळे ही प्रक्रिया ठप्प पडली.
पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असल्याने मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. इंग्रजी शाळा सुरू झाल्यास पटसंख्या वाढीला मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या सहा शाळा मिळणार
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार महापालिकेला सहा शाळा मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची ग्वाही दिली आहे. पुढील वर्षात या शाळा सुरू होतील. यामुळे महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याला मदत होईल. अशी माहिती शिक्षण विशेष समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.
पुढील सत्रात इंग्रजी शाळा सुरू करणार
मनपाच्या सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रक्रीया सुरू करण्यात आली होती. निविदा काढल्या होत्या. मात्र कोविड-१९ चा वाढता संसर्ग लक्षात घेता डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. जानेवारीपासून शाळा सुरू होतील. अशा परिस्थितीत इंग्रजी शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. त्या २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात सुरू होतील.
प्रा. दिलीप दिवे, सभापती शिक्षण विशेष समिती, मनपा