हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी ठरणार विदर्भातील पहिले ‘सौरग्राम’

By आनंद डेकाटे | Updated: January 10, 2025 17:52 IST2025-01-10T17:50:17+5:302025-01-10T17:52:48+5:30

Nagpur : शासकीय निधीच्या मदतीशिवाय केले साध्य

Chichghat-Rathi in Hinganghat taluka will become the first 'Solar Village' in Vidarbha | हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी ठरणार विदर्भातील पहिले ‘सौरग्राम’

Chichghat-Rathi in Hinganghat taluka will become the first 'Solar Village' in Vidarbha

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विदर्भातील पहिला शंभर टक्के ‘सौरग्राम’ होण्याचा मान आता लवकरच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट-राठी या गावाला मिळणार आहे. सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या या गावाने शासकीय निधीची कुठलीही मदत न घेता ही किमया साध्य करणाऱ्या या गावाने संपूर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान दोन गावे १०० टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून, या मोहिमेंतर्गत चिचघाट-राठी या गावाची निवड करण्यात आली असून, गावातील सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे ८११ किलोवॉट झाली आहे.

वर्धा शहरापासून ४० किमीच्या अंतरावर असलेले आणि महावितरणच्या हिंगणघाट (ग्रामीण) उपविभागांतर्गत असलेल्या चिचघाट-राठी या गावाचे हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते. मे हा अतिउष्णतेचा असल्याने सोबतच जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सूर्यप्रकाशाचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचा मानस करत येथील गावकऱ्यांनी महावितरणच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सूर्यघर’-मोफत वीज योजनेत सहभागी होत गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करून एकजुटीने ‘सौर’ उड्डाणाकडे यशस्वी प्रवास सुरू केला आहे.
गावामध्ये घरगुतीच्या ७०, औद्योगिक ४, वाणिज्यिक १, यासोबतच अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, पथदिवे आणि सार्वजनिक पाणीपुरवठा यासारख्या वीजजोडणी असलेल्या ग्राहकांनी छतावर सौरनिर्मिती प्रकल्प उभारून पर्यावरणपूर्वक वीजनिर्मिती सुरू केली आहे. घरगुती श्रेणीतील ७० ग्राहकांपैकी तब्बल ६५ ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने बँकेकडून कर्ज घेत, दोन ग्राहकांनी स्वखर्चाने, तर उर्वरित ग्राहकांना पी. व्ही. टेक्सटाइल्स या उद्योगाने दत्तक घेत सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारले आहे.

Web Title: Chichghat-Rathi in Hinganghat taluka will become the first 'Solar Village' in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.