चंद्रपूरमधील इरई व झरपट नद्या वेकोलिमुळे प्रदूषित होताहेत का?
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 10, 2024 18:16 IST2024-05-10T18:15:19+5:302024-05-10T18:16:23+5:30
हायकोर्टाचा सवाल : सरकार व जिल्हाधिकाऱ्यांना मागितले पुरावे

Are Irei and Jharpat rivers in Chandrapur getting polluted due to vecoli?
नागपूर : चंद्रपूरचे वैशिष्ट्य असलेल्या इरई व झरपट या दोन्ही नद्या वेकोलिमुळे प्रदूषित होत आहेत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे आणि यावर येत्या १२ जूनपर्यंत सबळ पुराव्यानिशी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
या नद्यांच्या संवर्धनासाठी माजी खासदार नरेश पुगलिया व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, जल संसाधन विभागाने १ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. वेकोलि या नद्यांमध्ये कचरा फेकते. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे व नद्यांचे आकारमान कमी होत आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. परंतु, वेकोलिने हा आरोप फेटाळून लावला. वेकोलि या नद्यांमध्ये केवळ प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडते. या नद्यांमधील पाणी प्रदूषित करीत नाही किंवा कचराही टाकत नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने हे परस्परविरोधी मुद्दे लक्षात घेता सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी वरील आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर, महानगरपालिकेतर्फे ॲड. महेश धात्रक तर, पाटबंधारे विभागातर्फे ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी कामकाज पाहिले.
असे आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे
दोन्ही नद्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीमधील रसायनेयुक्त पाणी, कचरा साठवणूक, चंद्रपूर वीज प्रकल्पातील फ्लाय ॲश इत्यादीमुळे प्रदूषित झाल्या आहेत. नदीपात्रामध्ये मोठमोठी झाडे वाढली आहेत. संजयनगर, कृष्णानगर, इंदिरानगर, अंचलेश्वर वॉर्ड, पठाणपुरा इत्यादी वस्त्यांतील नागरिकांसाठी नदीपात्रे शौचालय झाले आहे. दोन्ही नद्या वाचविण्याकरिता या समस्या दूर करण्यात याव्या, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.