बजेटमधून मध्य रेल्वेला, महाराष्ट्राला १५,५५४ कोटीं रुपये
By नरेश डोंगरे | Updated: February 1, 2024 21:12 IST2024-02-01T21:12:04+5:302024-02-01T21:12:23+5:30
वर्धा -यवतमाळ -नांदेड मार्गासाठी ७५० कोटी, तर अजनी सॅटेलाईट टर्मिनलला साडेसात कोटी

बजेटमधून मध्य रेल्वेला, महाराष्ट्राला १५,५५४ कोटीं रुपये
नागपूर : आजच्या बजेटमधून महाराष्ट्र, मध्य रेल्वेला १५,५५४ कोटीं रुपयांच्या घसघशीत निधींची तरतुद झालेली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव तसेच मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूरचे महाव्यवस्थापक त्यांच्या त्यांच्या मुख्यालयातून प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींसोबत जोडले गेले होते.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वर्धा -यवतमाळ - नांदेड या २७० किमीच्या रेल्वे मार्गासाठी आजच्या अर्थसंकल्पात ७५० कोटी रुपयांची तरतुद केली आहे. तर, अजनी (नागपूर) रेल्वे स्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल म्हणून विकसित करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांची तरतुद केली आहे. या शिवाय नागपूर विभागातील रेल्वेच्या विविध विकास कामांसाठी खालीलप्रमाणे तरतुद करण्यात आली आहे.
वर्धा-नागपूर तिसरी लाईन ७६ किमी १२५ कोटी रुपये, वर्धा-बल्हारशाह तिसरी लाईन १३२ किमी २०० कोटी रुपये, इटारसी-नागपूर लाईनच्या उर्वरित २८० किमीसाठी ३२० कोटी रुपये, वर्धा-नागपूर चौथी लाईन ७९ किमी १२० कोटी रुपये, वर्धा-चितोडा - दुसरी लाईन (४.२६ किमी) ४ कोटी रुपये, इटारसी - आमला - नागपूर - वर्धा - भुसावळ - जळगाव ७१३.८६ किमी २५ कोटी रुपये तसेच भुसावळ - बडनेरा अप आणि डाऊन मेन लाईन ११ कोटी रुपये.