"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:37 IST2026-01-09T11:37:01+5:302026-01-09T11:37:47+5:30
आरोप झालेल्यांसोबत सत्तेत बसणे हा कोणता प्रीती संगम आहे? असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
Raj Thackeray On CM Devendra Fadnavis: ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हा भीती संगम आहे, अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच सोबत घेऊन सत्तेत बसणे हा तुमचा कोणता प्रीती संगम आहे?" असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला असून भाजपच्या युतीवर घणाघाती टीका केली आहे.
'तुमचा तो प्रीती संगम आणि आमचा भीती संगम?'
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर "हा प्रीती संगम नसून भाजपच्या भीतीपोटी झालेला भीती संगम आहे," अशी टीका करत आहेत. या टीकेचा समाचार घेताना राज ठाकरे मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत, "देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणि देशात इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारे अभद्र युती करून सत्ता स्थापन केली आहे, तो काय प्रीती संगम आहे का? ज्यांना आयुष्यभर विरोध केला, ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच सोबत घेऊन मंत्रिमंडळात बसणे याला काय म्हणायचे?" असा सवाल केला.
सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार
राज ठाकरे यांनी भाजपच्या सध्याच्या राजकारणावर बोट ठेवताना म्हटले की, सत्ता मिळवण्यासाठी कोणाशीही हातमिळवणी करणे हा भाजपचा नवा पायंडा आहे. "तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्यासोबत आज मंत्रिमंडळात बसला आहात. हे जनतेला दिसत नाही का? विरोधकांना फोडून किंवा त्यांच्याशी तडजोड करून सत्तेत राहणे, हाच तुमचा खरा भीती संगम आहे," असा पलटवार त्यांनी केला.
"देवेंद्र फडणवीस उगाच काहीतरी कोट्या करतात. अजित पवार, एकनाथ शिंदे हे सोबत आलेत हा काय प्रीती संगम आहे का? बाकीच्या राज्यांमध्ये त्यांच्या ज्या अभद्र युत्या सुरु आहेत तो प्रीती संगम आहे का. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत गेलात, अकोल्यात एमआयएमसोबत गेलात. देवेंद्र फडणवीस यांनी आजूबाजूच्या खुर्च्यांवर बघावं की शेजारी कोण बसलं आहे. छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अजित पवार यांना जेलमध्ये टाकण्याचे आरोप करण्याचे काम तुम्हीच केलं आहे. ते त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात बसले आहेत. कोणत्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी बोलता तु्म्ही," असं राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे बंधूंच्या एकजुटीची चर्चा
राज आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे संकेत दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. त्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत आहोत, हे त्यांनी लक्षात घ्यावे."