Special research campaign for control of tuberculosis and leprosy | क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी विशेष शोध मोहीम 

क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी विशेष शोध मोहीम 

ठळक मुद्देअतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ टी.बी. व कुष्‍ठरोग तपासणीसाठी येणा-या पथकाला सहकार्य करण्‍याचे आवाहन

मुंबई : कोविड सोबत आपला लढा चालू असतानाच क्षयरोग, कुष्‍ठरोग यासारख्या इतर संसर्गजन्य आजारांबाबत देखील आपण सदैव सजग असणे गरजेचे आहे. या आजारांबाबत प्रतिबंधात्मक अधिक प्रभावीपणे राबविण्यासोबतच जनजागृती देखील व्हावी, या प्रमुख उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी दिनांक १ ते १६ डिसेंबर २०२० या दरम्यान विशेष शोध मोहीम राबविली जात आहे. या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी – स्वयंसेवक ५० लाख मुंबईकरांची तपासणी करणार आहेत. या स्वयंसेवकांना आवश्यक ते सहकार्य करावे”, असे आवाहन करतानाच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी मोहिमेत सहभागी होणा-या सर्व सदस्यांनी मोहिमेत हिरिरीने सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच या शोध मोहिमेदरम्यान ‘कोविड – १९’ च्या अनुषंगाने देखील तपासणी करावी आणि कोविडचे संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांची कोविड विषयक चाचणी करवून घ्यावी व आवश्यकतेनुसार यथायोग्य औषधोपचार करावेत, असेही निर्देश श्री. काकाणी यांनी याप्रसंगी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना दिले आहेत. मुंबईकर नागरिकांनी महापालिकेच्‍या क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी पथकास सहकार्य करुन शोध मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे पुन्हा एकदा यानिमित्ताने करण्यात येत आहे. 

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात क्षयरोग व कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी आजपासून एका विशेष मोहिमेचा प्रारंभ ‘जी दक्षिण’ विभागातील प्रभादेवी परिसरात असणा-या ‘कामगार नगर क्रमांक २’ येथून करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना श्री. काकाणी बोलत होते. या कार्यक्रमाला संबंधित जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. (श्रीमती) ---- बेसेकर, ‘जी दक्षिण’ विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. --- गोल्हर, संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.  क्षयरोग-कुष्ठरोग शोध मोहिमेची औपचारिक सुरुवात झाल्यानंतर लगेचच संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात व्यापक शोध मोहिमेची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. या शोध मोहिमे अंतर्गत महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. हे सर्वेक्षण साधारणपणे सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या कालावधी दरम्‍यान केले जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्‍या परिसरामधील साधारपणे १२ लाख १२ हजार ६९३ घरातील ५० लाख ९ हजार २७७ व्‍यक्‍तींची क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी करण्‍यात येणार आहेत. या तपासणी मोहिमेसाठी महापालिकेची ३ हजार ४५१ पथके कार्यरत असणार आहेत. 

वरीलनुसार प्राथमिक तपासणी दरम्‍यान आढळणा-या क्षयरोग संशयित रुग्‍णांच्‍या बेडख्‍याची तपासणी करण्‍यासह क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी संशयित रुग्‍णांच्‍या परिसर जवळ असणा-या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अगर सरकारी प्रयोग शाळेत मोफत केली जाणार आहे. तसेच क्ष-किरण चाचणी देखील निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत केली जाणार आहे. निर्धारित करण्‍यात आलेल्‍या खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत तपासणी करता यावी यासाठी संशयित रुग्‍णाला विशेष 'व्‍हाऊचर' देण्‍यात येणार आहेत. ज्‍यामुळे संशयित रुग्‍णाला खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये जाऊन मोफत चाचणी करवून घेता येणार आहे. यानुसार मोहिमे दरम्‍यान चाचणी केल्‍यानंतर क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्‍या रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत. तर याच मोहिमे दरम्‍यान आढळून येणा-या कुष्‍ठरोग संशयितांना नजिकच्‍या दवाखान्‍यात किंवा रुग्‍णालयात संदर्भित करण्‍यात येणार आहे. कुष्‍ठरोग संशयितांची तपासणी ही वैद्यकिय अधिका-यांमार्फत करण्‍यात येणार आहे.

-------------------------

क्षयरोग विषयक लक्षणांबाबत

क्षयरोग विषयक लक्षणांबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप असणे किंवा सायंकाळच्‍या वेळेस ताप येणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीमधून रक्‍त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधितानी तातडीने महानगरपालिकेच्‍या किंवा सरकारी रुग्‍णालयातून क्षयरोगाची चाचणी करवून घ्‍यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत आहे. तसेच ज्‍यांच्‍या कुटुंबामध्‍ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा झाल्‍याचा इतिहास आहे किंवा ज्‍यांना यापूर्वी क्षयरोगाची बाधा झाली होती, अशा व्यक्तिंनी क्षयरोगाच्‍या लक्षणांबाबत अधिक जागरुक असणे अत्‍यंत गरजेचे आहे. ज्‍यांना क्षयरोगाची बाधा झालेली आहे, त्‍यांनी औषधोपचाराचा कोर्स नियमितपणे व योग्‍य प्रकारे पूर्ण केल्‍यास क्षयरोग बरा होऊ शकतो. मात्र यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्‍या पध्‍दतीनेच औषधोपचार घेणे, अत्‍यंत आवश्‍यक आहे.

-------------------------

कुष्‍ठरोग विषयक लक्षणांबाबत

कुष्‍ठरोग विषयक लक्षणांबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, त्‍वचेवर फिकट – लालसर चट्टा असणे, त्‍या ‍ठिकाणी घाम न येणे, जाड – बधीर – तेलकट चकाकणारी त्‍वचा, कानाच्‍या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्‍या येणे, बधीरपणा व जखमा असणे, त्‍वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, हात व पायांमध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे, हातातून वस्‍तू गळून पडणे, चालतांना पायातून चप्‍पल गळून पडणे इत्‍यादी लक्षणे आढळून आल्‍यास संबंधीतांनी तातडीने महापालिकेच्‍या वा सरकारी रुग्‍णालयातून कुष्‍ठरोगाची तपासणी करवून घ्‍यावी. कुष्‍ठरोगाचे लवकर निदान करुन औषधोपचार चालू केल्‍यास होणारे शारीरिक व्‍यंग टाळता येते, अशीही माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे तपासणी मोहिमेच्‍या निमित्‍ताने देण्‍यात येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Special research campaign for control of tuberculosis and leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.