मोर्चा ‘वर्षा’वर धडकण्यापूर्वीच पोलिसांकडून नेत्यांची धरपकड; पोलिसांच्या कारवाईचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:09 IST2026-05-16T11:05:29+5:302026-05-16T11:09:57+5:30
मुंबईत आंबा-काजू उत्पादकांचा आक्रोश, शेट्टी, सपकाळ, जानकर यांच्यासह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, परवानगी नसल्याने मोर्चावर कारवाई

मोर्चा ‘वर्षा’वर धडकण्यापूर्वीच पोलिसांकडून नेत्यांची धरपकड; पोलिसांच्या कारवाईचा निषेध
मुंबई : विविध मागण्यांसाठी कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्याकडे शुक्रवारी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर, उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत, मराठी भाषा समितीचे दीपक पवार यांना शिवालय येथून ताब्यात घेतले. तर, गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघालेले उद्धवसेनेचे नेते विनायक राऊत, भाकपचे प्रकाश रेड्डी यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेण्यात आले. मोर्चापूर्वीच पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत आंदोलकांनी सरकारवर टीका केली.
अवकाळी पावसामुळे फटका बसल्याने आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने अत्यल्प मदत जाहीर केली आहे. आंबा उत्पादकांना हेक्टरी ५ तर काजू उत्पादकांना हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासह अन्य मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता. मात्र, मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी गिरगाव चौपाटी परिसरातच आंदोलकांना रोखले. मरीन लाइन्स स्टेशनवरही पोलिस प्रवाशांची चौकशी करत होते. आंदोलकांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून आझाद मैदानात नेऊन सोडले जात होते.
शिवालयाजवळच शेट्टी, सकपाळ, जानकरांना रोखले
गिरगाव चौपाटी येथून दुपारी तीन वाजता मोर्चा निघणार असल्याने तत्पूर्वी मंत्रालयासमोरील उद्धवसेनेचे पक्ष कार्यालय शिवालय येथे राजू शेट्टी, सकपाळ, जानकर, खा. सावंत आदी नेते जमा झाले. ते मोर्चासाठी निघण्याच्या तयारीत असतानाच अडविण्यात आल्याने नेत्यांनी सरकारचा निषेध करत रास्ता रोको केला. पोलिसांनी सकपाळ, शेट्टी, जानकर, पवार यांना ताब्यात घेत डोंगरी पोलिस ठाण्यात, तर खा. सावंत, राऊत, रेड्डी व काही आंदोलकांना आझाद मैदानात नेले.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निघालेल्या मोर्चाची पोलिसांच्या मदतीने शेतकरी विरोधी भाजप सरकारने अडवणूक केली. सरकारच्या या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. कोकणातील शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत पडेपर्यंत हा लढा थांबणार नाही.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी जमलो होतो, पण त्यापूर्वीच पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. उर्मट भाषा वापरली. गेले दोन महिने न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा कोकण दौऱ्यावर जाऊनही गांभीर्याने लक्ष दिले नाही. सरकार नियम-कायदे पायदळी तुडवून सत्ता चालवत असेल तर शेतकऱ्यांनी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय?
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमान शेतकरी संघटना