पाणी समस्येवर मात करणे त्रिसूत्रीने शक्य

By Admin | Updated: June 14, 2015 22:52 IST2015-06-14T22:52:11+5:302015-06-14T22:52:11+5:30

जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. लोकसहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शासकीय

Overcoming the water problem is possible by trivial | पाणी समस्येवर मात करणे त्रिसूत्रीने शक्य

पाणी समस्येवर मात करणे त्रिसूत्रीने शक्य

पालघर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. लोकसहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शासकीय यंत्रणांची सकारात्मक भूमिका या त्रिसुत्रीच्या आधारे आपण पाण्याच्या समस्येवर मात करू शकतो, असे मत आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केले.
राज्य भूजल प्राधिकरण आणि पाणीपुरवठा स्वच्छता विभागाद्वारे महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) २००९ या अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी करण्याकरिता एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असून भविष्यात त्यांची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्या दृष्टीने या अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत चांगले असूनही पावसाचे पाणी साठविण्याबाबत योग्य नियोजन नसल्याने पाणी वाहून जाते. वाया जाणारे पाणी अडवून ते साठविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचे योग्य नियोजन केल्यास त्या त्या भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, परिणामी भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ येणार नसल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी बांगर म्हणाले, जिल्ह्यातील भूजल परिस्थिती पाहता पूर्वेकडील ग्रामीण व अतिदुर्गम भागातील पाणी पातळीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भूजल पातळीची उपलब्धता लक्षात घेऊन जलसंधारण कामावर भर देण्यात आला आहे. दुर्गम भागातील रस्ते व पाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा यंत्रणा प्रयत्नशील असून शाश्वत विकासासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक भोयर यांनी भूजल अधिनियम २००९ मधील तरतूदी विषयी माहिती दिली.
(वार्ताहर)

Web Title: Overcoming the water problem is possible by trivial