ड्रिलिंग क्रेन हटली, प्रश्न कायम, ‘त्या’ मार्गावर अजूनही सावध प्रवास; नोटीस बजावून दोषींना सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 05:49 IST2026-05-01T05:48:47+5:302026-05-01T05:49:36+5:30
रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवाढव्य ड्रिलिंग क्रेन आणि बाजूला पडलेला लोखंडी बार अजूनही अपघाताची साक्ष देत आहेत. खाली भुसभुशीत झालेली जमीन पाहून इथे इतकी मोठी क्रेन उभीच कशी राहिली, हा प्रश्न अनेकांनी विचारला.

ड्रिलिंग क्रेन हटली, प्रश्न कायम, ‘त्या’ मार्गावर अजूनही सावध प्रवास; नोटीस बजावून दोषींना सोडले
मुंबई - मानखुर्दमधील क्रेन अपघातानंतर गुरुवारी सकाळी वाहतूक पुन्हा संथगतीने सुरू झाली खरी, पण रस्त्यावरचे वातावरण पूर्णपणे निवळलेले नाही. दुपारच्या उन्हात गाड्यांची रांग हळूहळू पुढे सरकत असताना, प्रत्येक चालकाच्या चेहऱ्यावर सावधगिरी आणि भीतीची भावना दिसत होती.
वाशीच्या दिशेने जाताना टाटा पॉवर हाउससमोरील उड्डाणपुलाचे काम अजूनही सुरू आहे. या कामामुळे तयार झालेला ‘बॉटल नेक’ वाहतुकीचा वेग वारंवार रोखताना दिसला. सहा लेनचा रस्ता इथे तीन लेनवर येतो आणि गाड्यांची लांब रांग लागते. पोलिसांच्या हातवाऱ्यांवरच वाहतूक सुरू हाेती. घटनास्थळाजवळ पोहोचताच गाड्यांचा वेग आपोआप कमी होतो. रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवाढव्य ड्रिलिंग क्रेन आणि बाजूला पडलेला लोखंडी बार अजूनही अपघाताची साक्ष देत आहेत. खाली भुसभुशीत झालेली जमीन पाहून इथे इतकी मोठी क्रेन उभीच कशी राहिली, हा प्रश्न अनेकांनी विचारला.
वाहतुकीवर नियंत्रण आणताना वाहतूक पोलिसांची धावपळ कायम होती. कोणत्या लेनवर ताण वाढतोय, कुठे कोंडी वाढतेय? यावर लक्ष ठेवत ते सतत वाहतूक वळवत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्यांवर तत्काळ ई-चलान कारवाई करत रस्ता मोकळा करण्यात आला. दुपारच्या सुमारास विशेषतः शिवाजीनगरकडून काही वाहने नियम तोडून उड्डाणपुलाखालून उलट दिशेने येताना दिसली आणि त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. अशा वेळी पोलिस कारवाईचा बडगा उगारताना दिसले. दुसरीकडे, अवजड वाहनांची ये-जा सायंकाळी पाचपर्यंत सुरू असल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण होता.
पोलिसाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना नोटीस बजावून सोडले
क्रेन अपघाताचे बळी ठरलेले पोलिस हवालदार संतोष चव्हाण हे कुटुंबाचा एकमेव आधार होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांचा आधार हरपला आहे. दुसरीकडे, गुरुवारी आरोपींना नोटीस बजावून सोडून दिल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. निष्काळजीपणा व बेदरकारपणामुळे झालेल्या अपघाताबाबत सफार इन्फ्राटेक कंपनीचे मालक रेहान मोहम्मद अस्लम मलिक, इंजिनिअर रंजन कुमार शुक्ला, साइट सुपरवायझर शाहिर मुक्तार शेख, तसेच लिफ्टिंग अँड लॅशिंग सोल्युशन इंडिया कंपनीचे मालक मोहम्मद सउद हैदर अलि चौधरी, इंजिनिअर / सुपरवायझर सलमान इम्रान खान, तसेच पायलिंग मशीनचा ऑपरेटर/चालक सुदिप्ता (राजा) दयाल प्रमाणिक आणि हेल्पर रिजू श्रीधर बिस्वास, इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी सर्वांना नोटीस बजावून सोडण्यात आले.
मूळचे रत्नागिरीचे रहिवासी असलेले चव्हाण नेरुळमध्ये कुटुंबीयांसोबत राहायचे. त्यांना मुलगी आणि मुलगा आहे. मुलगी अकरावी पास, तर मुलगा सातवीत आहे. पत्नी गृहिणी आहे. २८ एप्रिल रोजी पत्नीला कॉल करून ते घरी येण्यासाठी निघाले हाेते.